

नायगावमध्ये टाटा रुग्णालयाची मागणी
विरार, ता. १ (बातमीदार) : नायगाव पूर्व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे नागरिकांना उपचारांसाठी वसई, मुंबईसह अन्य शहरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी नायगाव पूर्वेत टाटा ट्रस्ट्सच्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी विविध सामाजिक संस्थांनी केली आहे. यासाठी टाटा ट्रस्ट्सकडे मोठ्या प्रमाणावर ई-मेल पाठविण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
नायगाव पूर्व परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले उभी राहिल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत आरोग्य सुविधांचा विस्तार झालेला नाही. विशेषतः गरीब, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दूरच्या रुग्णालयात हलवावे लागत असल्याने वेळेवर उपचार मिळण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
टाटा ट्रस्ट्सने देशातील विविध भागांत आरोग्य क्षेत्रात योगदान दिले आहे. त्याच धर्तीवर नायगावमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक तपासणी यंत्रणा आणि परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देणारे रुग्णालय उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नायगावला रेल्वे आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गाची जोडणी असल्याने येथे रुग्णालय उभारणे सोयीचे ठरू शकते. या सुविधेचा लाभ वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांनाही होऊ शकतो.
रणरागिणी चॅरिटेबल ट्रस्ट, स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान, आर. के. फाउंडेशन आणि श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांनी एकत्रितपणे ही मागणी पुढे रेटली आहे. प्रवीण खंडागळे यांनीही टाटा ट्रस्ट्सने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण दर्जेदार उपचारांपासून वंचित राहू नये, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.