'एक वीट शौचालयासाठी' ! डहाणूत श्रमदानातून साकारणार मुलींसाठी शौचालय

संदीप पंडित
Thursday, 22 October 2020

डहाणूमधील चंद्रनगर केंद्रातील जिल्हा परिषद दाभोण पिलेना पाडा येथे घटस्थापनेनिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे.

विरार : देशात विकास होत असला तरी देशातील मुलींना, महिलांना अद्यापही अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागते. ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना तर शौचालयासाठी झगडावे लागते. हीच समस्या सोडवण्यासाठी डहाणू येथील शाळेतील मुलींनी "एक वीट शौचालयासाठी' ही अभिनव संकल्पना राबविली असून त्याला पेन्स फाऊंडेशन आणि गॅलॅक्‍सी कंपनीने मदतीचा हात दिला आहे. 

महत्त्वाची बातमी : ठाणेकरांच्या स्वतंत्र धरणासाठी शिवसेनेला जाग येईल का? भाजपची खरमरीत टीका 

डहाणूमधील चंद्रनगर केंद्रातील जिल्हा परिषद दाभोण पिलेना पाडा येथे घटस्थापनेनिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळेतील मुलींसाठी शौचालयाची सोय व्हावी यासाठी गॅलॅक्‍सीचे मिलिंद पाटील यांनी हात भार लावला आहे. त्यांनी शाळेतील मुलींसाठी शौचालयाची सोय व्हावी यासाठी एक चळवळ सुरू केली आहे. श्रमदानातून शाळेतील शौचालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गावातील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेला प्रत्येकी एक विट देणगी दिली. तसेच गावकरी, दानशूर व्यक्ती, शिक्षक यांना नवरात्रीच्या नऊ दिवसांत शाळेला मदतीचे आवाहन केले. यावेळी शाळेतील मुलांनी गावामध्ये फिरून शाळेसाठी मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या शाळेमध्ये असलेले शौचालय हे 15 वर्षांपूर्वीचे मोडकळीस आलेले आहे. तसेच मुले आणि मुलींसाठी वेगवेगळे शौचालय नसल्याने सातवी-आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलींना शाळेत येण्यात खूप अडचणी येत आहेत. 

महत्त्वाची बातमी : "यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा", दमानिया यांचा खडसेंना इशारा

शाळेत 280 मुले-मुली शाळेत शिक्षण घेत असून शाळेत शौचालय नसणे ही मोठी शोकांतिका वाटायची. शाळेत शिक्षिका या कारणामुळे हजर होत नसे. तसेच शाळा जंगलात असल्याने स्त्री शिक्षिका गैरहजर राहत असे. किशोरवयीन मुलींसाठी शाळेतील शौचालयाची समस्या कायमची सुटावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. शाळेत शौचालय झाल्यावर आमच्या शाळेतील मुलीचा त्रास कमी होईल व शाळा दहावीपर्यंत होईल असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बारकू दळवी यांनी सांगितले; तर मुख्याध्यापक लहानू धर्मा बारगा व शिक्षक कोमलसिंग प्रतापसिंग शेरे यांनी आम्ही शिक्षकही यात श्रमदान करणार असल्याचे सांगितले. 

हे ही वाचा : लिलावती रुग्णालयातून अमित ठाकरेंना डिस्चार्ज

शाळेत शौचालय वापरण्यायोग्य नसल्याने आम्हाला अवघडल्यासारखे वाटते. शाळेत शौचालयाचे बांधून मिळणार असे ऐकल्याने अत्यंत आनंद झाला आहे. या शौचालयाची आम्ही मुली वाट पाहत होतो, ती इच्छा आज प्रत्यक्षात पेन्स सहयोग फाऊंडेशनचे संचालक योगेश सावे सर व गॅलेक्‍सी कंपनीच्या सदस्यांनी पूर्ण केली. या शौचालयाच्या बांधकामासाठी आम्ही सर्व आठवीच्या मुली लोकवर्गणी काढू व स्वतः श्रमदान करू. 
- अंजली पिलेना, विद्यार्थिंनी 

नक्की वाचा : राज्य सरकारच्या परवानगीनंतरच CBIला तपास करता येणार, गृहमंत्र्यांची माहिती

ग्रामीण दुर्गम भागातील अशा शाळेत लोकपुढाकाराने शौचालय बांधण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून मुलींच्या शिक्षणात बाधा आणणारी एक मोठी सामाजिक समस्या दूर होईल. तसेच गावकऱ्यांच्या पुढाकाराने एक मोठे काम पूर्ण होईल. यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन पेन्स सहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सावे यांनी केले. 

(संपादन : वैभव गाटे)

Toilets for girls to be constructed through self work in Dahanu


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toilets for girls to be constructed through self work in Dahanu