घाऊक बाजारात टोमॅटो १० रुपये 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

भेंडी, गवार आदी भाज्यांचे भाव एपीएमसीतील घाऊक बाजारात वाढले असले, तरी टोमॅटोचे दर गेल्या आठवड्यापेक्षा निम्म्याने घसरलेले आहेत. पाकिस्तानात टोमॅटोची निर्यात बंद झाल्याने भावावर हा परिणाम झाला आहे. 

वाशी - भेंडी, गवार आदी भाज्यांचे भाव एपीएमसीतील घाऊक बाजारात वाढले असले, तरी टोमॅटोचे दर गेल्या आठवड्यापेक्षा निम्म्याने घसरलेले आहेत. पाकिस्तानात टोमॅटोची निर्यात बंद झाल्याने भावावर हा परिणाम झाला आहे. 

घाऊक बाजारात इतर भाज्या ४० ते ५० रुपये किलोच्या भावात असताना टोमॅटो मात्र घाऊक बाजारात आठ ते दहा रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही टोमॅटो २० रुपये किलोच्या भावात मिळत आहे. 

उत्पादन वाढले असल्याने हे भाव कमी झालेले नाहीत तर पाकिस्तानात निर्यात बंद झाल्याने टॉमेटो मुबलक प्रमाणात नवी मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे भाव घसरले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. हा भाव आणखी काही दिवस कायम राहणार आहेत, असेही माहितीही व्यापाऱ्यांनी दिली.

बंगळूरुमधूनही आवक 
कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्र, गुजरात आणि बंगळूरुमधून टोमॅटोची आवक होते. सध्या या सर्व भागांतून ही आवक होत आहे. मुंबई आणि उपनगरांना टोमॅटोची मागणी पूर्ण करण्यासाठी ६० ते ७० टोमॅटोच्या गाड्या बाजारात येणे गरजेचे असते. तेवढ्या गाड्या नियमित  येत आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

थेट खरेदीचाही परिणाम
कृषीमालावरील नियमन शिथिल केल्याने आता काही मालाच्या गाड्या थेट मुंबईत जाऊ लागल्याने नवी मुंबईतील बाजारात कृषीमाल येणे थोडे कमी झाले आहे. अनेक व्यापारी थेट शेतात जाऊन माल खरेदी करतात. त्यामुळे बाजारात मालाला मागणी कमी आहे. त्यामुळे हे भाव खाली आले आहेत, असे विक्रेते संजय पाटील यांनी सांगितले.

Web Title: Tomatoes in the wholesale market 10 rupees