आज रात्रीपर्यंत कूपर रुग्णालयाचे मॉडेल लसीकरण केंद्र होणार तयार

भाग्यश्री भुवड
Monday, 4 January 2021

कूपर रूग्णालयात मॉडेल केंद्र तयार करण्यासाठी आता 30 हून अधिक मजूर रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करत आहे.

मुंबई: मुंबईतील डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या समोरील 4 हजार चौरस फूट इमारत यापूर्वी वसतिगृह म्हणून वापरली जायची. मार्चमध्ये, तिचे रुपांतरण कोविड -19 च्या रूग्णांसाठी आयसोलेशन केंद्रात केले गेले. आता 29 डिसेंबरपासून त्याचे मॉडेल लसीकरण केंद्रात रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, कूपर रूग्णालयात मॉडेल केंद्र तयार करण्यासाठी आता 30 हून अधिक मजूर रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करत आहे. मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदार एकॉन यांना सोमवारी रात्रीपर्यंत केंद्र पालिकेच्या स्वाधीन करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, जर लस लवकर उपलब्ध झाली तर येत्या शुक्रवारपासून पूर्णपणे काम करण्यास तयार असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर यांनी सांगितले आहे. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात पालिकेच्या सात रुग्णालयांसह कूपर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. मुंबईत पहिल्या टप्प्यात 1.26 लाख आरोग्य सेवा कामगारांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रविवारी, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसींचा अत्यावश्यक काळातच वापरण्यास मान्यता दिली. लवकरच लसीची सुरूवात होईल, अशी अपेक्षा करत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना कूपर रुग्णालयातील काम वेगवान पद्धतीने करण्यास सांगितले आहे. गेल्या आठवड्यात या केंद्राचे काम सुरू केले आहे आणि काम संपवण्यासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे. या केंद्रासाठी जास्त बदल केलेले नाहीत, कारण हा वॉर्ड आधीपासून आयसोलेशन वॉर्ड म्हणून वापरला जात होता, ”असे साइट एकॉन कंत्राटदाराने सांगितले.

प्रवेशद्वाराजवळ एका शेडखाली या केंद्राचे प्रतीक्षा क्षेत्र असेल. कॉरिडोरमध्ये नोंदणी केली जाईल. ज्यामुळे तीन लसीकरण कक्षात प्रवेश केला जाईल. प्रत्येक खोलीत एकावेळी जवळपास पाच जणांना लस दिली जाऊ शकते, अशी सोय करण्यात आली आहे. लस घेतलेल्या स्वयंसेवकांना निरीक्षण कक्षात बसवले जाईल. जिथे खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. लसीकरणानंतर जर कोणाला त्रास किंवा विपरीत परिणाम जाणवला तर दोन वेगळ्या रुमची तयारी देखील ठेवण्यात आली आहे जिथे त्यांच्यावर उपचार केले जातील.

लस मिळाली तर शुक्रवारपासून काम सुरू करु

कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी सांगितले की, गंभीर परिणामांवर उपचार करण्यासाठी अ‍ॅनेस्थेसिया, ईएनटी, छाती आणि सामान्य औषधांच्या तज्ज्ञांची टीम उपलब्ध असेल. शिवाय, कंत्राटदारांना आजच सर्व काम करुन द्यायला सांगितले आहे, त्यानंतर, इतर जे उरलेले काम असेल ते केले जाईल. बाकी सर्व तयार झाले आहे. लस मिळाली तर येत्या शुक्रवारपासून काम सुरू केले जाईल. मी स्वत: यात जातीने लक्ष देत आहे.

"आम्हाला केंद्रावर जास्त खर्च करावा लागला नाही. आम्ही वॉटर कूलर बसवत आहोत आणि शौचालयांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे" , असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

हेही वाचा- कोविड-19 च्या गंभीर रूग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या टॉसिलीझुमॅबच्या मागणीत घट

पालिकेने सध्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालये तसेच एफ दक्षिण आरोग्य कार्यालयात पाच स्टोरेज सेंटरची निवड केली आहे. तेथे लसीची पहिल्या बॅचचा साठा केला जाईल. दरम्यान, कांजूरमार्गमध्ये ही लस साठवणूकीसाठी इमारत तयार आहे.  कूपर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रातून दिवसाला 2 हजार लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते. यासाठी दहा टीम दोन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी नेमले जाईल.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Tonight Cooper Hospital model vaccination center ready


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tonight Cooper Hospital model vaccination center ready