"माझे कुटुंब'मध्ये नवी मुंबई राज्यात अव्वल; दहा लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण 

सुजित गायकवाड
Tuesday, 13 October 2020

कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला राज्यभरात नवी मुंबई शहर पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे.

नवी मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला राज्यभरात नवी मुंबई शहर पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत सरकारने दिलेले लक्ष्य पूर्ण करून एकूण लोकसंख्येच्या 80 टक्के लोकांचे सर्वेक्षण पालिकेने पूर्ण केले आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने 14 लाख लोकसंख्येपैकी तब्बल दहा लाख 53 हजार लोकांचे सर्वेक्षण पूर्ण करून माहिती ऑनलाईन भरली आहे. 

जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू: सामना

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत नवी मुंबई महापालिकेने आघाडी घेत राज्यातील इतर महापालिकांना मागे सोडले आहे. सरकारतर्फे पालिकेला दिलेल्या तीन लाख 16 हजार 449 कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त सर्वेक्षण पालिकेने करून दाखवले आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये पालिकेने तीन लाख 35 हजार 469 कुटुंबांमधील 10 लाख 53 हजार 896 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही कामगिरी राज्यात सर्वोत्तम असल्याचा दावा पालिकेने केला आहे. नवी मुंबई हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकात दोन ते तीन कोरोनादूतांचा समावेश असलेली 670 पथके तयार केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे शारीरिक तापमान तसेच ऑक्‍सिजन पातळी तपासून नोंदविण्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्‍वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय, याची माहिती सरकारच्या ऍपमध्ये नोंदवत आहेत. तसेच कोणत्या व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत काय याबाबतचीही माहिती संकलित केली जात आहे. 

Powercut : मुंबईतील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

14 ऑक्‍टोबरपासून दुसरा टप्पा 
पहिला टप्पा संपल्यानंतर आता 14 ऑक्‍टोबरपासून दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण केले जाणार आहे. या पथकांमार्फत पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्‍सिजन सॅच्युरेशन दुसऱ्यांदा मोजले जाणार आहे. तसेच त्यावेळेची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top in Navi Mumbai State in My Family Survey of one million population completed