पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गजबजली; हॉटेल व्यावसायिकांचा पुनश्‍च हरिओम 

पी एम पाटील
Friday, 9 October 2020

आजपासून सरकारच्या परवानगीने पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारे सुरू करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी पर्यटकांनी समुद्र किनारे गजबजले होते. 

पालघर ः मागील महिन्यात काही अटी-शर्तीवर पर्यटनस्थले चालू करण्याची परवानगी शासनाने दिली होती. मात्र सर्व समुद्र किनारे, बीच बंद ठेवल्याने पर्यटकांनी पर्यटनाला जराही प्रतिसाद दिला नाही. मात्र आजपासून सरकारच्या परवानगीने पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारे सुरू करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी पर्यटकांनी समुद्र किनारे गजबजले होते. 

AIIMS चा अहवाल नाकारण्याचा दबाव CBIवर येईल, काँग्रेसचा आरोप
दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यापांसून बंद असलेल्या पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरु झाला आहे. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील तलासरी तालुक्‍यातील झाई ते वसई तालुक्‍यातील पर्यटनस्थळावर पर्यटकांना सर्व सेवा सुविधा पुरवण्यासाठी व्यवसायिक सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील झाई, बोर्डी, घोलवड, चिखला, डहाणू, धाकटी डहाणू, वरोर, चिंचणी, तारापूर, नांदगाव, आलेवाडी, मुरबे, शिरगाव, वडराई, माहीम, रेवाळे, टेम्भी, केळवे, दांडा, उसरणी, भादवे, एडवण, कोरे, दातीवरे, आदी ठिकाणच्या पर्यटक व्यवसायिकांनी निवास गुहाची साफसफाई, रंगरंगोटी, खाद्य पदार्थ, व त्यासाठी सामानाची तजवीज, कामगारांची मनधरणी, ही कामे अतिशय जलदगतीने सुरु असल्याचे येथील व्यवसायिकांनी सांगितले. 
 

- पोलिस यंत्रणा सज्ज 

जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा देखील या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे. पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढत जाणार आहे. त्यादृष्टीने सागरी किनाऱ्यावरील पोलिस ठाण्यांनी देखील दुरक्षेत्र पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सुचना केल्या आहेत. 

मुंबई रेल्वे गाड्यांचे नियोजन करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना

- समाजमाध्यमांवरुन जाहिरात 

रेल्वे सेवा या महिन्यापासून सुरु करण्या येईल, अशी व्यवसायिकांना आशा आहे. रेल्वे सेवा सुरु केल्यानंतर मुंबई, ठाणे येथील पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर, गुजरात मधील पर्यटक देखील पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना प्राधान्य देत असल्याने जिल्ह्यातील सर्वच पर्यटन व्यवसायातील तरुणांनी किनाऱ्यावरील व पर्यटनस्थळ ठिकाणची हॉटेल पुन्हा उघडीत असल्याचे समाज माध्यमाद्वारे जाहिराती सुरू केल्या आहेत. पुढील महिन्यात येणाऱ्या दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या नाताळच्या हंगामात गेले अनेक महिने पर्यटनाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व्यवसायिक सज्ज झाले आहेत. 

 

- पर्यटन बंदीबाबत संभ्रम 

सरकार व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील समुद्र किनारे, धरणे, नदी, तलाव, धबधबा आदी ठिकाणी पर्यटकांना जाण्यास 8 ऑक्‍टोबर पर्यंत बंदी घातली होती. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी फिरकत नव्हते. मात्र 8 ऑक्‍टोबर पर्यंतची बंदीची मुदत संपल्यानंतर सरकार अथवा जिल्हा प्रशासनाने मुदतवाढ केल्याचे परिपत्रक अथवा आदेश जिल्ह्यातील हॉटेल अथवा पर्यटन निवस्थानाच्या संघटना यांना दिले नाहीत. त्यामुळे काही व्यवसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

 

सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. हळूहळू पर्यटकांचा प्रतिसाद वाढत जाईल. आज पहिल्यादिवशी हवा तसा पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे हॉटेल व्यवसायिक सांगत आहेत. 
आशिष पाटील,
अध्यक्ष, केळवे बीच पर्यटन उधोग संघटना, पालघर, 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism started in Palghar district, hotel restaurant started