माथेरानमध्ये पर्यटकांची गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

मुंबई : गेल्‍या कित्येक महिन्यांपासून माथेरान - कर्जत मिनी बस सेवेच्या फेऱ्या अचानकपणे रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसह विद्यार्थी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

मुंबई : गेल्‍या कित्येक महिन्यांपासून माथेरान - कर्जत मिनी बस सेवेच्या फेऱ्या अचानकपणे रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसह विद्यार्थी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. 

कर्जत आगारप्रमुखांच्या नियोजनशून्य कारभारामुळे माथेरानला येणारी सायंकाळी 4.45 वाजताची मिनी बस फेरी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. या वेळी प्रवाशांनी कर्जत आगारात दूरध्वनी केला असता, चालक आजारी असल्याने फेरी रद्द केल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

पर्यटनस्थळ माथेरानमध्ये जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाहून नॅरोगेज रेल्वेमार्गावर धावणारी मिनी ट्रेन सेवा, तसेच नेरळ-माथेरान घाटात प्रवासी टॅक्‍सी सेवा आहे. 2008 पासून राज्य सरकारची मिनी बस सेवा कर्जत येथून माथेरानसाठी सुरू झाली आहे. या बस सेवेसाठी माथेरानकरांनी अनेक वेळा संघर्ष केला आहे.

सरकारची मिनी बस सेवा महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त ठरत आहे. परंतु, अनेक महिन्यांपासून कर्जत आगाराकडून कोणतेही कारण पुढे करून मिनी बस फेऱ्या रद्द करण्याचा सपाटा सुरू आहे. 

माथेरान बसस्थानकात 40 ते 45 प्रवासी बसची वाट पाहत होते. नियोजित वेळेवर बस न आल्याने कर्जत आगारात दूरध्वनीवरून विचारणा केली असता, चालक आजारी असल्यामुळे आज बस येणार नाही, असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले. 
सीताराम कुंभार, प्रवासी 

मी सुटीवर असल्याने आणि माथेरान मार्गावर बस चालवणारे फक्त तीन ते चार अनुभवी चालक आहेत. आज कामावर असलेल्या चालकांची अडचण झाल्याने आगारातून बस पाठवली नाही. 
एस. पी. यादव, व्यवस्थापक, कर्जत आगार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist inconvenience in Matheran