उद्या भारत 'बंद' आहे माहितीये ना ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

देशव्यापी संपात 72 संघटना, शासकीय, निमशासकीय कार्यालयांना फटका 

मुंबई -  केंद्र आणि राज्यातील प्रलंबित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने बुधवारी (ता. 8) देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यात 72 संघटना सहभागी होणार आहेत. बॅंक, पोलाद, विमा, गोदी, वीज, बंदर, तेलउत्पादन यांसह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना याचा फटका बसणार आहे. 

मोठी बातमी : मुंबई महानगरपालिकेत ६८० कोटींचा पाणी घोटाळा..

राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जुनी पेन्शन योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा मोर्चे, आंदोलने केली, तरी राज्य आणि केंद्र सरकार हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. त्यामुळे बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून यात राज्यातील 72 संघटना सहभागी होणार आहेत.

यात मंत्रालयातील कर्मचारी संघटना, सेवा व वस्तू कर विभाग, मध्यवर्ती मुद्रणालय, शिधावाटप, सरकारी दवाखाने, मोटार (आरटीओ) वाहन विभाग कर्मचारी संघटना आणि शिवसेना कामगार संघटनाही सहभागी होणार आहेत. शासकीय, निमशासकीय आणि कंत्राटी कर्मचारी संपात सहभाग होणार असल्याने नागरिकांच्या दैनंदिन सेवा ठप्प होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. संपात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्‍वास काटकर यांनी केले आहे. 

मोठी बातमी : ठाकरे सरकारचा भाजपच्या बड्या आमदाराला 'जोर का झटका'

एसटी सुरू राहणार : 

एसटीची ऑल इंडिया बॅकवर्ड क्‍लासेस एम्प्लॉईज फेडरेशन (आयबीसेफ) प्रत्यक्षात संपात न उतरता काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार आहे. त्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनाही संपकाळात काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्यामुळे एसटीची सेवा नियमित सुरू राहील, असे कर्मचारी संघटनांनी सांगितले.

trade union calls for bharat bandh on eight January day to day operation might affect 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trade union calls for bharat bandh on eight January day to day operation might affect