Mumbai News : बदलापूर महामार्गावर एक मार्गिका बंद; वाहतूक कोंडीने चालक हैराण

रस्त्यावरील रोड स्टॉपर देखील पडले तुटून
traffic jam due to closure of one lane Badlapur highway dombivali mumbai
traffic jam due to closure of one lane Badlapur highway dombivali mumbaisakal

डोंबिवली - बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील रस्त्याचा भूसंपादनाचा वाद असल्याने येथील एक मार्गिका आठ दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. नेवाळी नाका दिशेने जाणारी मार्गिका बंद करण्यात आल्याने बदलापूर कडे जाणाऱ्या अरुंद मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

एक मार्गिका बंद करण्यात आल्यानंतर या ठिकाणी वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने रस्त्यावर रोड स्टॉपर लावले होते. परंतू वाहनांची संख्या एवढी असते की हे स्टॉपर देखील तुटून पडले आहेत. वाहन कोंडीने चालक हैराण झाले असून एका ठराविक अंतराच्या वादामुळे तासन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामध्ये रुग्णवाहिका अडकून पडत आहे. सामान्य प्रवाशांना याचा त्रास होत असून प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावात एमआयडीसीने पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादन केले असून यामध्ये तफावत आढळून आली आहे. हक्काच्या जागेसाठी वसार गावातील स्थानिक शेतकरी सध्याच्या घडीला लढा देत आहेत. गेल्या 25 वर्षापासून त्यांचा हा लढा सुरु असून प्रशासन त्यात लक्ष घालत नसल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.

पोलिस प्रशासन, एमआयडीसी अधिकारी यांच्याशी चर्चा करत आठ दिवसांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या जागेतील बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील नेवाळी नाका मार्गे जाणारी मार्गिका ही बंद केली आहे. 20 दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला असून यावर तोडगा न निघाल्यास पूर्ण रस्ता बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या घटनेला आठ दिवस उलटले असून प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नसल्याचे शेतकरी सांगतात.

महामार्गावरील एक मार्गिका ही बंद असल्याने दुसऱ्या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे, कल्याण दिशेकडून येणाऱ्या वाहनांना अंबरनाथ, बदलापूर जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो. बदलापूर एमआयडीसीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या मार्गावर जड अवजड वाहनांची वर्दळ असते. वसार गावाजवळ अरुंद मार्गावरुन वाहतूक सुरु असून ट्रक, कंटेनरचे ट्रक, टॅंकर अशी मोठी वाहने आल्यास कोंडी होत आहे.

30 मीटरचा रस्ता हा बंद करण्यात आला असून त्यापुढे नेवाळी नाका मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेताना ही मोठी वाहने अडकत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या पाठी इतर वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. दुचाकीस्वार आपल्या दुचाकी जागा मिळेल तशा या ठिकाणाहून मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्यामुळे या कोंडीत भर पडते. या वाहनांच्या कोंडीत रुग्णवाहिका अडकत असल्याने रुग्णांचे देखील हाल होत आहेत.

रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये, अपघात होऊ नये, नियमात वाहतूक व्हावी यासाठी रस्त्याच्या मधोमध रोड स्टॉपर लावले आहेत. परंतू वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे स्टॉपर तुटून पडले आहेत. स्टॉपर तुटल्याने वाहन चालक जागा मिळेल तशी आपली वाहने चालवित असल्याने कोंडीत भर पडत आहे. अनेकदा गावकरीच या ठिकाणी रस्त्यावर उतरत झालेली वाहनांची कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

वसार गावाजवळ रस्त्याची एक बाजू बंद केलेली असल्याने तेथून वाहन काढताना आमची दमछाक होत आहे. रोज कामानिमित्त कल्याणला ये जा होत असल्याने या मार्गाचा वापर होता. नेमका कोणत्या कारणासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा जागेचा वाद असेल तर प्रशासनाने त्यावर तोडगा काढावा. कायम सामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते हे कितपत योग्य आहे.

अतुल पाटील, चालक

या ठिकाणी जागेचा वाद असल्याचा फलक लागला होता, मात्र त्यावर पुढे काही झाले नसल्याने त्याकडे वाहनचालक लक्ष देत नव्हते. आता रस्ताच बंद करण्यात आल्यानंतर वाहनचालकांना त्रास जाणवू लागला आहे. करदात्या नागरिकांना योग्य सोयी सुविधा देण्यास प्रशासन कायम अयशस्वी होताना दिसते. शेतकरी व प्रशासनाचा वाद येथे आहे त्याचा फटका मात्र वाहनचालकांना बसत आहे.

अमित देशपांडे, वाहन चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com