टीएमटी बंद पडल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

कोंडीमुळे सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. 

ठाणे : ठाणे बाजारपेठेत रविवारी (ता. 25) सायंकाळी टीएमटी बस अचानक बंद पडल्याने वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका जांभळी नाका, तलावपाळी, कोर्ट नाका, सिडको मार्गावरील वाहतुकीला बसला.

त्यातच तलावपाळी येथे सिंधी समाजाचा एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली; मात्र या कोंडीमुळे सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. 

बाजारपेठेतील जिल्हा परिषद कार्यालयासमोरील कोर्ट नाक्‍याहून ठाण्याच्या दिशेने जाणारी एक टीएमटी बस अचानक बंद पडली. या बाजारपेठेत सायंकाळच्या वेळेत फेरीवाले आणि ग्राहकांची गर्दी असते. तसेच हा रस्तादेखील अरूंद असल्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर ही नादुरुस्त बस बाजूला करण्यात आली; मात्र त्यानंतरही या परिसरात वाहतूक कोंडी कायम होती.

त्यातच, तलावपाळी व कोपरी येथे सिंधी समाजाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने वाहतूक खोळंबून त्यात आणखी भर पडली होती. तसेच घोडबंदर मार्गावरील तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि पातलीपाडा येथेही वाहतूक संथगतीने सुरू होती.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic lapses in market as TMT closes