
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते हे मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरु आहे. या कामामुळे रस्ता रुंद होणार असला तरी, दुसरीकडे मेट्रो स्थानकाचे जिने थेट रस्त्याच्या मधोमध उतरत असल्यामुळे ते प्रवाशांसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मेट्रो स्थानक असणार आहे, तेथे प्रवासी जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करून सेवा मार्ग हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. सोमवारी मेट्रो स्थानके व त्या अनुषंगिक विविध विकास कामांच्या पहाणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते. यावेळी ठाणे पालिका, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.