थोडी लक्षणं दिसली तरी लगेच उपचार करा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

पूजा विचारे
Wednesday, 2 September 2020

 राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती, तसंच आरोग्य यंत्रणेच्या कामासंबंधी माहिती दिली आहे. लक्षण नसलेल्यांना आयसीयू बेड देता कामा नये, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

मुंबईः राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती, तसंच आरोग्य यंत्रणेच्या कामासंबंधी माहिती दिली आहे. लक्षण नसलेल्यांना आयसीयू बेड देता कामा नये, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

तसंच बेडची अडचण येऊ नये म्हणून अंमलबजावणी करत असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्याधिकाऱ्यांना आरोग्य सुविधा मोफत पुरवण्याचे निर्देश दिल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर भर देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान थोडी लक्षणं दिसली तरी त्वरित उपचार करुन घ्या असं आवाहनही राजेश टोपेंनी नागरिकांना केलं आहे. 

श्रीमंत लोक कोरोनाची लक्षणं नसताना आयसीयू बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं आयसीयू बेडवर जाऊन बसतात. त्यामुळे या गोष्टींपासून जागरुक राहिलं पाहिजे. लक्षण नसलेल्यांना आयसीयू बेड देता कामा नये, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत, त्यांनाच बेड्स दिली पाहिजेत, असंही ते म्हणालेत. 

हेही वाचाः काळजी घ्या! मुंबईत मलेरियाचा कहर, वाढत्या रुग्णांसह दोघांचा मृत्यू

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ,असं त्यांनी सांगितलं. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रायकर यांचा मृत्यू होणं हे दुर्देवी असून पुण्यात बेड्सची आणि रुग्णवाहिकांची कमतरता असणं दुर्देवी आहे. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

रुग्णवाहिका न मिळाल्यानं एखाद्या रुग्णाला त्रास होणं हे चुकीचं आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये हा आमचा प्रयत्न असतो. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना रुग्णवाहिका किती घ्याव्यात आणि किती घेऊ नये याबाबत कोणतंही बंधन घातलेलं नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लागेल तेवढ्या रुग्णवाहिका घेण्याचे आदेश दिले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रमाणापेक्षा जास्त रुग्णवाहिका घेतल्या तरी काही हरकत नाही. मात्र रुग्णांना मोफत रुग्णवाहिका मिळाली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिल्याचंही ते म्हणालेत.

अधिक वाचाः मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक; वाचा सविस्तर बातमी

पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातलं  असल्याचंही टोपे म्हणालेत. जम्बो कोविड सेंटरही बनविण्यात आली असून या ठिकाणी रुग्णांना बेड्सची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Treat immediately even if slight symptoms appear Appeal by Health Minister Rajesh Tope


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treat immediately slight symptoms appear Appeal by Health Minister Rajesh Tope