झाडांची छाटणी पक्ष्यांच्या पिलांच्या जीवावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

मुंबईतील विविध ठिकाणी सध्या पावसाळापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी वृक्ष प्राधिकरणाकडून सुरू झाली आहे. फांद्यांच्या छाटणीदरम्यान पक्ष्यांची घरटीही पडत असल्याने पिलांचा नाहक जीव जात असल्याने रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) पक्षीप्रेमी संस्थेने विशिष्ट कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) पालिकेने अमलात आणावी अशी मागणी केली आहे.

मुंबई - मुंबईतील विविध ठिकाणी सध्या पावसाळापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी वृक्ष प्राधिकरणाकडून सुरू झाली आहे. फांद्यांच्या छाटणीदरम्यान पक्ष्यांची घरटीही पडत असल्याने पिलांचा नाहक जीव जात असल्याने रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) पक्षीप्रेमी संस्थेने विशिष्ट कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) पालिकेने अमलात आणावी अशी मागणी केली आहे.

दरवर्षी वृक्ष प्राधिकरण कंत्राटदारांकडून मुंबईतील झाडांची छाटणी करून घेते; मात्र छाटणीदरम्यान काही वेळा अतिरिक्त फांद्या आणि खोडही कापले जाते. त्याबाबत अनेकदा वृक्षप्रेमींनी वृक्ष प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. फांद्यांच्या कापणीत झाडांवरील पक्ष्यांची घरटीही जमिनीवर पडतात. पक्षी उडून जात असले, तरी त्यांना पिलांना वाचवता येत नाही. पिले जमिनीवर पडून जखमी होतात. कित्येकदा कुत्र्यांचा हल्ला किंवा वाहनाखाली चिरडून त्यांचा मृत्यू होतो. अशा घटना मुख्यत्वे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नजीक जास्त दिसून येतात. दरवर्षी पक्ष्यांबाबतच्या अंदाजे साठ तक्रारी आमच्या हेल्पलाईनला येतात, अशी माहिती ‘रॉ’चे संस्थापक व ठाणे प्रादेशिक वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक ॲड्‌. पवन शर्मा यांनी दिली. कोणाला असे जखमी पक्षी वा त्यांची पिले आढळल्यास त्याची माहिती वन विभागाच्या किंवा आमच्या हेल्पलाईनला द्यावी, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. त्याचा तपशीलवार अहवाल पालिकेसमोर मांडला जाईल असेही त्यांनी सांगितले. फांद्यांची छाटणी करू नका, असे आमचे म्हणणे नाही, परंतु झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी पालिकेने विशिष्ट कार्यपद्धती अमलात आणावी, अशी मागणीही आपण पत्राद्वारे करणार असल्याचे ते म्हणाले.

नक्कीच विचार करू
नव्या यंत्राच्या माध्यमातून फांद्यांची छाटणी योग्य पद्धतीने सुरू असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरणाने दिली. पक्षीप्रेमी संस्थांच्या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल, असेही सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree cutting affected bird life