आदर्शाला रायगड झेडपीचा दे धक्का

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शिक्षक जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात दाखल झाले होते. संपूर्ण सभागृह भरले होते. सभागृहाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे सव्वा अकरा वाजताच्या सुमारास कार्यक्रमाचे स्थळ अचानक बदलावे लागले. हा कार्यक्रम नंतर दीड किलोमीटर अंतरावरील पीएनपी नाट्यगृहात घेण्यात आला. 

अलिबाग : शिक्षक म्हणजे शिस्त, नियोजन असे समजण्यात येते. मात्र, "आदर्श' शिक्षकांना देण्यात येणारा पुरस्कार सोहळा आज गाजला तो नियोजनाचा अभाव, गोंधळ, बेशिस्तपणा आदी कारणांमुळे. या सोहळ्याचे ठिकाण ऐनवेळी बदलण्यात आल्याने तर या गोंधळात भर पडली. 

शिक्षक दिनानिमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. परंतु, गणेशोत्सवामुळे शाळांना सुट्टी असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता असल्याने हा कार्यक्रम अचानक घेण्यात आला. कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण सभापती नरेश पाटील आदी उपस्थित होते. 

सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शिक्षक जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात दाखल झाले होते. संपूर्ण सभागृह भरले होते. सभागृहाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे सव्वा अकरा वाजताच्या सुमारास कार्यक्रमाचे स्थळ अचानक बदलावे लागले. हा कार्यक्रम नंतर दीड किलोमीटर अंतरावरील पीएनपी नाट्यगृहात घेण्यात आला. 

काही शिक्षकांनी पुरस्कार मिळाल्यानंतर शांत बसण्याऐवजी भर सभागृहात छायाचित्रे काढली. काही उत्साही सेल्फीही काढत होते. त्यामुळे उपस्थितांनी आश्‍चर्य व्यक्त केले. शिक्षकांचा हा "आदर्श' चर्चेचा विषय ठरला. 
या वर्षापासून शिक्षकेतर कर्माचाऱ्यांनाही जिल्हापरिषदेकडून पुरस्कार देण्यात आले. सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 
 
नेत्यांचीही धावाधाव 
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्थळ अपुऱ्या जागेमुळे अचानक बदलण्यात आले. त्यामुळे काही नेत्यांचीही धावाधाव झाली. त्यामुळे त्यांनीही नाराजी व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trouble for teachers in Alibaug