esakal | मुंबई महापालिका रोखणार 'सुप्त क्षयरोगा'चा प्रसार; राबविणार विशेष मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

Tuberculosis

मुंबई महापालिका रोखणार 'सुप्त क्षयरोगा'चा प्रसार; राबविणार विशेष मोहिम

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : सुप्त क्षयरोग’ प्रसारास (Tuberculosis Infection) प्रतिबंध करण्यासाठी पालिका विशेष प्रकल्प (BMC Project) राबवणार आहे. याअंतर्गत क्षयरोग रुग्णांच्या (TB patients) संपर्कातील व्यक्तिंची मोहीम स्वरुपात तपासणी (people checking) केली जाणार असून सुप्त क्षयरोगाचे मापन करण्यासाठी पहिल्यांदाच विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे. लोकसंख्येची (population) घनता लक्षात घेता मुंबई हे भारतातील सर्वांत मोठे व दाट लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळेच मुंबईसारख्या शहरात क्षयरोग प्रसारास प्रतिबंध होण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न करणे आणि विविध स्तरीय उपाययोजना व्यापकपणे व प्रभावीपणे राबवणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य खात्याने सुप्त क्षयरोग संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी एक विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.

हेही वाचा: पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण; 233 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

या प्रकल्पांतर्गत महापालिका क्षेत्रातील क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची मोहीम स्वरुपात चाचणी करण्यात येणार आहे. यामुळे क्षयरोग प्रसारास प्रतिबंध होण्यासह 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत’ करण्याच्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे जाण्यासही मोलाची मदत होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे. या कार्यक्रमाला कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे मुंबईच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे, ‘शेअर इंडिया’ या संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येळदंडी, प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सतीश कैपिल्यवार, ‘सीडीसी इंडिया’ या संस्थेच्या डॉ. मेलिसा न्येंदक,  ब्रायन कोलोडझिएस्की, लोकेश उपाध्याय, डॉ. राजेश देशमुख व डॉ. क्रिस्टीन हो हे मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, सुप्त क्षयरोग संसर्ग मापन प्रकल्पामुळे क्षयरोग विरोधातील लढ्यास बळ मिळेल आणि क्षयरोग मुक्त मुंबईच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच हा उपक्रम क्षयरोग संसर्गास आळा घालण्यासह क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल.

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात क्षयरोग विषयक ‘आयजीआरए’ ही वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आवश्यक ती प्रयोगशाळा स्थापन करणे, त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल. या प्रकल्पांतर्गत क्षयरोग रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व घरातील व्यक्तिंची सुप्त क्षयरोग संसर्गासाठी तपासणी केली जाणार आहे. या तपासणी दरम्यान सुप्त क्षयरोगाची बाधा आढळून आल्यास राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार व निर्धारित वैद्यकीय उपचार क्रमानुसार बाधित व्यक्तिंवर उपचार करण्यासह आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल. तसेच सक्रीय क्षयरोग असणा-या रुग्णांवर देखील निर्धारित औषधोपचार केले जातील.

हेही वाचा: मुंबईत बस मार्ग बदलल्याने प्रवाशांची झाली कोंडी; बेस्ट उपक्रमामुळे गोंधळ

काय आहे सुप्त क्षयरोग?

सुप्त क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात. तसेच अशी बाधा झालेल्या व्यक्तिंमध्ये क्षयरोगाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे नसतात. दरम्यान, सुप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तिमध्ये भविष्यात ‘सक्रीय क्षयरोग’ उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्त क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावरयोग्य ते उपचार केल्यास संबंधीत व्यक्तिस भविष्यात सक्रीय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो.

सामान्यपणे क्षयरोग विषयक वैद्यकीय चाचण्यांमध्ये सुप्त क्षयरोगाचे निदान होत नाही. त्यामुळे सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी आयजीआरए चाचणी करावी लागते. या अंतर्गत संबंधीत व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन ही चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल सामान्यपणे चाचणी केल्यापासून 24 तासांमध्ये मिळतो.

loading image
go to top