पवईजवळ टनल बोअरींग मशिन अडकली; मुंबईपासून जर्मनीपर्यंतच्या तज्ज्ञांना पडला पेच

पवईजवळ टनल बोअरींग मशिन अडकली; मुंबईपासून जर्मनीपर्यंतच्या तज्ज्ञांना पडला पेच

मुंबई : पवईत वर्षभरापूर्वी अत्यंत दुर्मिळ घटना घडली असून, जलबोगदा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे टनेल बोअरिंग मशीन 90 मीटर जमिनीखाली अडकले आहे. ऑगस्ट 2019 मध्ये हे मशीन अकडले असून, ते बाहेर काढण्यासाठी अद्याप महापालिकेला मार्ग सापडला नाही. थेट जर्मनीवरून यासाठी तज्ज्ञही आले; मात्र त्यांनीही हात टेकले. अमेरिकेतील सिएटलमध्ये अशाप्रकारे मशीन चार वर्षे अडकून पडली होती. 

जोगेश्‍वरीतील वेरावली-पवई-घाटकोपर असा 6.6 किलोमीटरचा बोगदा खोदण्याचे काम असताना ही मशीन पवईजवळ गाळात अडकली. त्यामुळे पवई ते घाटकोपरपर्यंतचा बोगदा खोदण्याचे काम रखडले आहे. हे काम पटेल इंजिनिअरिंग ही कंपनी करत असून, मशीन जर्मनीमधील कंपनीने बनवलेली असल्याने त्या तंत्रज्ञानेही पाहणी केली; मात्र मशीन काढण्यात अद्याप यश आलेले नाही. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे प्रमुख अभियंता शिरीष उचगावकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
वेरवली ते पवईपर्यंतचा 2.2 किलोमीटरचा बोगदा तयार झाला आहे, तर पवईपासून घाटकोपरपर्यंत बोगदा तयार करण्यासाठी पवईतून बोगदा खोदण्याचे काम सुरू असताना 1.2 किलोमीटर अंतरावर ही मशीन गाळात अडकली. 2.8 मीटर व्यासाची 50 मीटर लांबीची मशीन आहे. गाळात अडकल्याने ही मशीन हलूही शकत नाही. महापालिकेने आयआयटी मुंबईचे प्राध्यापक विश्‍ववंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. 

पर्याय काय उपयोगाचे? 
टनेल बोअरिंग मशीन अडकलेल्या पुढे काही अंतरावर नवा शाफ्ट (जमिनीवरून 90 मीटर खाली खोदकाम) खोदून बोगद्याचे काम सुरू करावे. तसेच टनेल बोअरिंग मशीन काढण्यासाठीही नवा शाफ्ट खोदावा. 

नक्की काय झाले? 
बोगद्याचे खोदकाम हे प्रामुख्याने भूमिगत कातळाखालून होते. जेणेकरून जमीन खचण्याचा धोका कमी होतो; मात्र टनेल बोअरिंग मशीन अडकलेल्या 200 मीटर परिसरात जमीन भुशभुशीत आहे. हा भाग ज्वालामुखीच्या राखेपासून बनलेला मातीसदृश आहे. अशा प्रकारे बोगदा तयार करताना बोअरवेल चाचणी करून जमिनीच्या स्तरांचा अभ्यास करून आराखडा तयार केला जातो; मात्र या वेळी या जमिनीचा अंदाज चुकला असण्याची शक्‍यता आहे. पालिकेने आतापर्यंत 80 किलोमीटरचे जलबोगदे तयार केले आहेत; मात्र पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. तसेच भुयारी मेट्रोचे कामही सुरळीत आहे. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

विलंबामुळे खर्च वाढला 
वेरावलीपर्यंत बोगदा खोदण्याचे काम सुरू असताना महाकाली लेण्यांना धक्का पोहण्याची शक्‍यता असल्याने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या कामाला स्थगिती दिली होती; मात्र नंतर या भागातील बोगदा तयार करण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळेही काम रखडले. जानेवारी 2012 मध्ये हे काम सुरू झाले होते ते 2018 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. यासाठी पालिकेने 183 कोटी रुपयांचा करार केला होता; मात्र विलंबामुळे हा खर्च आता 263 कोटी रुपयांपर्यंत खर्चाचा अंदाज पोहचला आहे. 

Tunnel boring machine stuck near Powai Experts from expert were embarrassed  

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com