'त्यांनी' रातोरात बदलले..! अन् मुले परिक्षेला गेली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

तुर्भे एमआयडीसीतील हनुमाननगरमधील महावितरणच्या विजेच्या रोहित्राला रविवारी (ता. 23) रात्री 11 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. मुख्य नागरी वस्तीत आगीच्या ज्वाला आणि धूर निघू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील हनुमाननगरमधील महावितरणच्या विजेच्या रोहित्राला रविवारी (ता. 23) रात्री 11 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. मुख्य नागरी वस्तीत आगीच्या ज्वाला आणि धूर निघू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत महावितरणचे अभियंता संजय मुंडे यांच्यासह तुर्भे पोलिसांना कळविण्यात आले, परंतु महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. 

ही बातमी वाचली का? कांदा, बटाटा, लसणाच्या दरात मोठी घसरण! वाचा काय आहेत भाव..?

तुर्भे एमआयडीसीतील हनुमान मंदिरासमोरील महावितरणच्या विजेच्या रोहित्रातून तेलगळती झाल्याने रविवारी रात्री भीषण आग लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तुर्भे पोलिस, महावितरण आणि वाशी येथील अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. प्रशासकीय फौजफाटा दाखल होईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. बाजूलाच गॅस सिलिंडर ठेवण्यात आल्याने स्फोट होण्याची भीती निर्माण झाली होती. थोड्या प्रतीक्षेनंतर अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या वेळी अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले. तुर्भे नाक्‍यावरील महत्त्वाचे रोहित्र जळाल्यामुळे सर्व परिसरातील वीजपुरवठा बंद झाला होता. हे जळालेले रोहित्र तत्काळ बदलणे शक्‍य नसल्याचे महवितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना सांगितले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान एक रात्र आणि एक दिवसाचा कालावधी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती; मात्र बारावीची परीक्षा लक्षात घेता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून रातोरात जळालेले रोहित्र बदलण्यात आले. 

ही बातमी वाचली का? घर खरेदी करायचंय? लवकरच नवी मुंबईत ५ हजार घरे... 

रातोरात बदलले जळालेले रोहित्र 
सध्यस्थितीत बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, म्हणून वीज वितरण कर्मचाऱ्यांना जी काही मदत लागेल, जो काही खर्च येईल, त्याची जबाबदारी शिवसेनेचे तुर्भे विभागप्रमुख तय्यब पटेल यांनी घेतली. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी टेम्पो, तसेच क्रेन मागवून रातोरात जळालेले रोहित्र बदलले. ही आग विझविण्यासाठी दोन अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या होत्या; तर रोहित्र बदलण्यासाठी एक टेम्पो आणि एक क्रेन तसेच अग्निशमनचे 16 कर्मचारी आणि पोलिस फाटा तैनात होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turbhe transformer caught fire mahavitaran navi mumbai