कांदा, बटाटा, लसणाच्या दरात मोठी घसरण! वाचा काय आहे भाव?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा, लसूणची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात सध्या कांदा १८ ते २३, बटाटा १० ते १७, लसूण ४० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. दरात झालेल्या घसरणीमुळे गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा, लसूणची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात सध्या कांदा १८ ते २३, बटाटा १० ते १७, लसूण ४० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. दरात झालेल्या घसरणीमुळे गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

ही बातमी वाचली का? हवे होते 200 कोटींचे कर्ज... गमावले 20 लाख

एपीएमसी बाजारात सध्या नवीन ओल्या लसणाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. हा नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्‍यात येत असतात; मात्र दोन वर्षांपूर्वी लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने उत्पादनात घट झाली होती. परिणामी, लसणाचे दर गगनाला भिडले होते. दोन वर्षांपूर्वी २०० ते २५० रुपयांनी लसूण विकला जात होता; मात्र गतवर्षी व यंदादेखील लसणाचे दर तेजीत होते. घाऊक बाजारात मिळणारा प्रतिकिलो लसूण १५० ते २०० रुपये किलोने उपलब्ध होता; मात्र बाजारात आता आवक वाढली असल्याने या दरात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या लसणाला ४० ते १०० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. सध्या मध्य प्रदेश, गुजरातमधून नवीन लसणाच्या २० गाड्यांची आवक होत आहे.

ही बातमी वाचली का? बेस्ट झालं... बस थांब्यावर व्हर्टिकल गार्डन होणार

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी, वाशीतील घाऊक बाजारात कांद्याचे दर नोव्हेंबर महिन्यात १२० ते १६० रुपये किलोच्या घरात पोहचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते; मात्र आता नवीन कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली येथून बाजारात सध्या १२० ते १४० गाड्या दाखल होत आहेत. आवक वाढल्याने कांद्याला सध्या २० ते २७ रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे खाण्यातून हद्दपार झालेला कांदा आता पुन्हा दिसू लागला आहे. गृहिणींनादेखील कांदा स्वस्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

ही बातमी वाचली का? एलबीएस मार्ग, दहिसर नदी घेणार मोकळा श्वास

अवकाळी पावसामुळे बटाट्याचे पीक जमिनीतच खराब झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती. परिणामी, बटाट्याच्या दरात मोठी वाढ होऊन ते २८ ते ३० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते; तर आता शीतगृहात साठवलेला बटाटा हळूहळू बाहेर येण्यास सुरुवात झाली असून बाजारात सध्या १० ते १५ गाड्या दाखल होत आहेत. याशिवाय नवीन बटाटादेखील उत्तर प्रदेश, हरयाना, आग्रा येथून बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे बटाट्याला सध्या घाऊक बाजारात १० ते १७ रुपये किलो दर मिळत आहे.

कांदा, बटाटा, लसूणच्या दरात घसरण झाली आहे. मध्यंतरी कांद्याने डोळ्यांत पाणी आणले होते; मात्र आता नवीन कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून दर आटोक्‍यात आले आहेत. त्याचप्रमाणे लसूण व बटाट्याच्या दरातदेखील घसरण सुरू आहे. मार्च महिन्यात बाजारात कांदा, बटाटा, लसूणची आणखी आवक वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर दरात आणखी घसरण होण्याची शक्‍यता आहे.
- राजेंद्र शेळके, व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onions, potatoes, garlic fall in price in vashi market