अभिनेत्रीने दारूच्या नशेत घातला धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

दारुच्या नशेत असलेल्या रुहीने तिच्या मोटारीने इतर गाड्यांना धडक दिली. यामध्ये चार दुचाकी आणि तीन मोटारींचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.

मुंबई : मॉडेल आणि 'कॅलेंडर गर्ल्स' या चित्रपटातील अभिनेत्री रुही सिंह हिने दारूच्या नशेत वाहनांना धडक दिली व एका पोलिसाच्या वर्दीवरील नावाचा बॅचही काढला. रुही हिच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून मोटार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रूहीचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 1) रात्री दोनच्या सुमारास राहुल आणि स्वप्नील या मित्रांसह रुही (वय 30) तिच्या मोटारीने घरी परतत होती. लिंकिंग रोडवर पोहोचल्यानंतर तिघांपैकी एकाला फूड आऊटलेटमधील वॉशरुममध्ये जायचे होते. पण आऊटलेट बंद असल्याने तेथील कर्मचाऱयांनी त्यांना जाऊ दिले नाही. यावेळी तिघांनी तिथे गोंधळ घालायला सुरुवात केली. दारुच्या नशेत असलेल्या रुहीने तिच्या मोटारीने इतर गाड्यांना धडक दिली. यामध्ये चार दुचाकी आणि तीन मोटारींचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. यावेळी एका कर्मचाऱयाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

पेट्रोलिंग करणारी पोलिसांची व्हॅन काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. तिघांनी पोलिसांसोबतही वाद घालण्यास सुरुवात केली. रुहीने एका पोलिसाच्या नावाचा बॅच काढला. यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. स्वप्नील आणि राहुलला तातडीने अटक करण्यात आली. मात्र, रात्र झाल्याने रुहीवर अटकेची कारवाई केली नाही. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रुहीने प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'कॅलेंडर गर्ल्स' चित्रपटात भूमिका केली होती.

दरम्यान, सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. रुहीच्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सनी ट्रोल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TV actress Ruhi Singh booked for allegedly assaulting police officer and drunk driving video viral