esakal | सचिन वाझेच्या अडचणीत वाढ, ACBकडे भ्रष्टाचाराच्या दोन तक्रारी दाखल

बोलून बातमी शोधा

Sachin waze
सचिन वाझेच्या अडचणीत वाढ, ACBकडे भ्रष्टाचाराच्या दोन तक्रारी दाखल
sakal_logo
By
अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या दोन तक्रारी आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला(एसीबी) प्राप्त झाल्या आहेत. दोन्ही तक्रारी ही उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या(असंपदा) आहेत. त्यातील एक तक्रार निनावी होती.

टीआरपी प्रकरणात तत्कालीन तपास अधिकारी सचिन वाझे याने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ईडी) तपास करत आहेत. बार्कच्या अधिकाऱ्यांनी वाझेला लाच दिल्याचा जबाब ईडीला दिला आहे. बार्कने आपल्या वही खात्यात म्हणजे आपल्या बँक खात्यात एक बनावट नोंद केली आहे. त्यांच्या जागेवर बांधकाम होत आहे, त्यासाठी एका बनावट कंस्‍ट्रक्‍शन कंपनीकडे पैसे हस्तांतरित केल्याचं त्यांच्या वही खात्यात लिहिले आहे. त्यात हवाला ऑपरेटरचाही वापर झाल्याचे बोलले जात आहे. पण याप्रकरणाच्या पूर्वी राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) वाझेच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

हेही वाचा: मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात, पण मृतांचा आकडा वाढताच

भ्रष्टाचार आणि असंपदेप्रकरणी या दोन्ही तक्रारी होत्या. त्यातील एक तक्रार ख्वाजा युनुस प्रकरणी निलंबित झाल्यानंतर पहिली तक्रार एसीबीला प्राप्त झाली होती. तर दुसरी तक्रार ही निनावी असून ती वाझे यांनी पुन्हा पोलिस दलात सामील झाल्यानंतर प्राप्त झाली होती. त्यातही असंपदा जमा केल्याप्रकरणी ही तक्रार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, यापूर्वी निनावी तक्रारींची एवढी दखल घेतली जात नव्हती. पण 2015 मधील परिपत्रकानुसार अशा प्रकरणांची नोंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाझेविरोधात आलेल्या निनावी तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. पण दोन्ही तक्रारींमध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील एका तक्रारीत वाझेच्या गैरव्यवहारांची माहिती देण्यात आली आहे. सचिन वाझे स्फोटक प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी नुकतीच केंद्रीय अन्वेषण विभागाने वाझेचा जबाब नोंदवला होता.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

two complaints filled against sachin waze bribery case