esakal | म्हणून डॉक्टरांना देव म्हणतात; दोन वेगळ्या रक्तगटाचं किडनी प्रत्यारोपण यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून डॉक्टरांना देव म्हणतात; दोन वेगळ्या रक्तगटाचं किडनी प्रत्यारोपण यशस्वी

गुप्ता यांना त्यांच्या पत्नीने किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. एखाद्या रुग्णाला अवयव प्रत्यारोपणाची गरज भासल्यास त्याच रक्तगटाच्या व्यक्तीचा अवयव असणे गरजेचे असते.

म्हणून डॉक्टरांना देव म्हणतात; दोन वेगळ्या रक्तगटाचं किडनी प्रत्यारोपण यशस्वी

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : रुग्ण आणि किडनीदाता या दोघांचेही रक्तगट वेगळे असताना किडनी प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया मुंबईतील रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे. दोन वेगळ्या रक्त गटातील किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीतील लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

चार महिन्यानंतर किडनी प्रत्यारोपण

देशभरात गेले चार महिने अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. आता, अनलाॅकनंतर या प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. 39 वर्षीय अभिषेक गुप्ता यांची तीन वर्षापूर्वी किडनी निकामी झाली होती. तेव्हापासून ते डायलीसिसवर होते. त्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. मात्र, कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती असल्याने गेल्या चार महिन्यात ही प्रक्रिया लांबणीवर पडली. अभिषेक गुप्ता यांचा रक्त गट बी पॉझिटिव्ह आहे. त्यांना याच रक्तगटाच्या किडनीची आवश्यकता होती. त्यामुळे, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : गॅंगरिन झालेला पाय थोडक्यात बचावला, मधुमेहाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात 

गुप्ता यांना त्यांच्या पत्नीने किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. एखाद्या रुग्णाला अवयव प्रत्यारोपणाची गरज भासल्यास त्याच रक्तगटाच्या व्यक्तीचा अवयव असणे गरजेचे असते. मात्र, त्यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. त्यामुळे भिन्न रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया राबवणे आव्हानात्मक होते.

तसेच, भिन्न रक्तगटाच्या व्यक्तींमधील प्रत्यारोपण केल्यास गुप्ता यांना संसर्ग होण्याची भीती होती. मात्र, रुग्णालयातील डॉ. अश्विन पाटील, डॉ. ए. रावल, डॉ. सुधिरंजन दास, डॉ. जे. जी. लालमलानी यांच्या चमूने 27 जुलैला हे प्रत्यारोपण केले. गुप्ता यांना गेले काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या पत्नीला घरी सोडण्यात आले आहे. गुप्ता यांची प्रकृती चांगली असल्याने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याची माहिती रुग्णालयाच्या ऍकेडमिक डॉ. ऋषी देशपांडे यांनी दिली आहे. 

मुंबईत 3 हजार रुग्ण किडनीच्या प्रतिक्षेत - 

सध्या मुंबईत किडनी अवयवाच्या प्रतिक्षा यादीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. किडनीला होणारे आजार हे अनेकदा खूप उशिरा लक्षात येत असल्यामुळे याला सायलेंट किलर या आजाराने ही ओळखलं जातं. सध्या मुंबईत जवळपास 3 हजार 536 जणांना किडनीची आवश्यकता आहे. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने ही माहिती दिली आहे. त्यामुळे, ही प्रतिक्षा यादी वाढती आहे मात्र, दाते कमी असल्यामुळे अनेकांना आपला जीव ही गमवावा लागतो. त्यामूळे, मरणोत्तर आणि जिवंतपणी ही अवयव दान करु शकतो. यासाठी लोकांनी न घाबरता पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

two different bloodgroups but kidney was matched miracle by doctors

loading image
go to top