दोन मेट्रो प्रकल्प मे महिन्यात रुळावर, 14 जानेवारीपासून ट्रायल रन सुरू होणार

तेजस वाघमारे
Friday, 11 September 2020

 एमएमआरडीएमार्फत राबविण्यात येत असलेले दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2 ए आणि अंधेरी ते दहिसर मेट्रो 7 हे दोन्ही रेल्वे प्रकल्प मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या मेट्रोच्या ट्रेन 11 डिसेंबर रोजी चारकोप डेपोत येणार आहे.

मुंबई: एमएमआरडीएमार्फत राबविण्यात येत असलेले दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2 ए आणि अंधेरी ते दहिसर मेट्रो 7 हे दोन्ही रेल्वे प्रकल्प मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या मेट्रोच्या ट्रेन 11 डिसेंबर रोजी चारकोप डेपोत येणार असून 14 जानेवारीपासून ट्रेनच्या चाचणी सुरू होतील. तसेच मे महिन्यात हे दोन्ही मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.

दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2 ए आणि अंधेरी ते दहिसर मेट्रो 7 हे दोन्ही रेल्वेचे डब्बे ऑगस्ट महिन्यात मुंबईत दाखल होणार होते. मात्र कोरोनामुळे हे डब्बे पोचण्यात अडचणी आल्या. मेट्रोचे डब्बे 10 डिसेंबर रोजी चारकोप डेपोत येणार आहेत. त्यानंतर दर महिन्याला दोन ते तीन डब्बे डेपोत येतील. 10 ट्रेन मे महिन्यापर्यंत दाखल होतील, असे राजीव म्हणाले. सुरुवातीला 20 ते 25 मिनिटांनी एक ट्रेन धावेल, ट्रेनची संख्या वाढल्यानंतर ही वेळ कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. या दोन्ही मेट्रोचा कारडेपो चारकोप येथे असणार आहे.
 
एवढे असणार प्रवास भाडे
- 0 ते 3 किलोमीटर -  10 रुपये
- 3 ते 12 किलोमीटर - 20 रुपये
- 12 ते 18 किलोमीटर - 30 रुपये
- 18 ते 24 किलोमीटर - 40 रुपये
- 24 ते 30 किलोमीटर - 50 रुपये
- 30 ते 36 किलोमीटर - 80 रुपये

 

लॉकडाऊन नंतर परतले कामगार

लॉकडाऊनमुळे मेट्रो प्रकल्पांसाठी काम करणारे कामगार आपापल्या राज्यात निघून गेले होते. याचा परिणाम मेट्रोच्या कामावर झाला. कामगारांना परत आणण्यासाठी एमएमआरडीएने रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून विशेष ट्रेनमधून कामगारांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले. तर काही कामगारांना विमानाने आणण्यात आल्याचे राजीव यांनी सांगितले. सध्या मेट्रो प्रकल्पांवर 6 हजार 332 कामगार कार्यरत आहेत. कोरोनापूर्वी 7 हजार 109 कामगार काम करत होते.
 
राज्यातील कामगारांची पाठ

लॉकडाउनमुळे मेट्रो प्रकल्पात काम करणारे कामगार आपल्या गावी परतल्याने मेट्रो प्रकल्पांचे काम ठप्प झाले. यामुळे राज्यातील कामगारांना मेट्रोच्या कामात सामावून घेण्यासाठी एमएमआरडीएने जाहिरात केली. त्याला राज्यातील खूप कमी कामगारांनी प्रतिसाद दिला. केवळ 150 ते 200 महाराष्ट्रातील कामगार मेट्रो प्रकल्पात काम करत असल्याचे राजीव यांनी सांगितले.

--------------------

(संपादनः पूजा विचारे) 

two metro projects track May trial run start January 14


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two metro projects track May trial run start January 14