भरधाव ट्रकच्या धडकेत दोन पोलिस गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Truck Accident

भरधाव ट्रकच्या धडकेत दोन पोलिस गंभीर

कासा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तीन अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. जखमींवर उपचार रुग्णालयांत सुरू आहेत. महामार्गावर पहाटे १.४५ वाजता मेंढवण येथे कारचा अपघात झाल्याची माहिती चारोटी महामार्ग पोलिसांनी मिळाली होती. घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना आयआरबीच्या पेट्रोलिंग वाहनातून कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सोमटा येथे पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त ट्रक दिसला. पोलिस व्हॅन थांबवून ते चौकशीसाठी गेले असता एमएच ०४ जेयू ३५६६ हा भरधाव वेगाने ट्रक आला. या वाहनाने दोन पोलिस आणि आयआरबी कर्मचाऱ्यांना धडक दिली. चौघांवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र पोलिस गंभीर जखमी असल्याने मिरा रोड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. आयआरबी कर्मचाऱ्यांवर मनोर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक फरारी झाला असून कासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कार अपघातात पाच जण जखमी

महामार्गावर आज पहाटे ४.३० वाजता दापचरी जकात नाका येथे कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. जकात नाका परिसरात वाहनांच्या तपासणी बॅरिगेट्‍स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी अरुंद जागा असल्याने कार बॅरिगेट्‍सला धडकल्यानंतर ट्रकला ठोकर दिल्याने कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत.

चिंचपाडा येथे ट्रक उलटला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज सकाळी ९.३० च्या दरम्यान चिंचपाडा येथे भरधाव मालवाहू ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक देत ट्रक खड्ड्यात उलटा झाला. या अपघातात चालक जखमी झाला. त्याला आयआरबी रुग्णवाहिकेतून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Two Policemen Seriously Injured In Highspeed Truck Hit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top