esakal | गोरेगावमध्ये दोन गोदामांना आग
sakal

बोलून बातमी शोधा

गोरेगावमध्ये दोन गोदामांना आग

आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना श्‍वसनाचा त्रास झाला. 

गोरेगावमध्ये दोन गोदामांना आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोरेगावमधील उद्योगनगर येथे शनिवारी सकाळी व्यावसायिक इमारतीमधील दोन गोदामांना भीषण आग लागली. आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना श्‍वसनाचा त्रास झाला. 

गोरेगाव पश्‍चिमेकडील उद्योगनगर इंडस्ट्रियल इस्टेटमधील भूखंड क्र. 7 वर तळमजला अधिक तीन मजली इमारतीमध्ये शनिवारी सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रासायनिक आणि फार्मास्युटिकल उत्पादनांचा साठा होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरला. 

अग्निशमन दलातील जवानांनी आठ बंब, सहा जम्बो टॅंकर, एक टॅंकर, दोन क्‍यूआरव्ही, एक टीटीएल व दोन बीव्ही व्हॅन यांच्या मदतीने सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. 

आगीमुळे इमारतीच्या काही तुळया (बीम) आणि खांब (कॉलम) कोसळले. काही खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे ही इमारत सील केली जाण्याची शक्‍यता आहे. 
आग विझवत असताना अग्निशमन केंद्र अधिकारी वैभवकांत दरीपकर (38) व मनोज चव्हाण (30) यांना धुरामुळे गुदमरल्यासारखे वाटू लागले. त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती महापालिका नियंत्रण कक्षाने दिली. 

सहा स्फोटांमुळे भडका 
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या ठिकाणी ज्वलनशील साहित्याचा मोठा साठा होता. त्यामुळे सहा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. या इमारतीत आगप्रतिबंधक यंत्रणा होती का, याची तपासणी केली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई होईल, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

loading image
go to top