राज्यात दोन "वेलनेस हब' : जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

आरोग्य पर्यटनाची राजधानी होण्याची महाराष्ट्रात क्षमता आहे. देशातील 50 टक्के परकी गुंतवणूक राज्यात आहे. स्टार्टअप आणि कौशल्य विकासाची जोड देऊन राज्याला आरोग्य पर्यटनात उंचीवर नेण्याचे धोरण राबवण्यात येईल. आरोग्य पर्यटनातील सर्व घटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी सरकार कटीबद्ध आहे. 
- संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकासमंत्री 

मुंबई : देशविदेशांतील पर्यटकांना एकाच ठिकाणी आयुर्वेद, युनानी, योगा, रेकी, ऍक्‍युप्रेशरसारख्या आरोग्य सुविधा देण्यासाठी इगतपुरीजवळ प्रत्येकी 100 एकरात दोन "वेलनेस हब' उभारणार, अशी घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी केली. 

पॅंडोजा सोल्युशनतर्फे मुंबईत झालेल्या पहिल्या "महाराष्ट्र हेल्थ ऍण्ड वेलनेस पर्यटन परिषदे'च्या उद्‌घाटनावेळी रावल बोलत होते. "सकाळ' या परिषदेचे माध्यम प्रायोजक होते. रावल म्हणाले की, पर्यटनवाढीसह आरोग्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. वेलनेस हबमुळे देशविदेशांतील पर्यटकांना एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्‍वास रावल यांनी व्यक्त केला. 

आरोग्य पर्यटन क्षेत्रात भारतात 2020 पर्यंत 500 अब्ज रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. त्यासाठी आरोग्य-वैद्यकीय क्षेत्र, सरकार, रुग्णालये, धोरणकर्ते आदींनी एकत्र येऊन व्यासपीठ निर्माण करावे, अशी अपेक्षा या वेळी परिषदेतील सहभागींनी व्यक्त केली. 

पॅंडोजा सोल्युशनच्या संचालिका मालविका खडके यांनी परिषद घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, देशाच्या आरोग्य क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय दबदबा आहे. पर्यटनाची जोड देऊन वैद्यकीय क्षेत्रातील घटकांना एकत्र आणल्यास रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळू शकते. लायप्रो ओबेसो सेंटरचे डॉ. शशांक शाह, गल्फ मेडिकल विद्यापीठाचे डॉ. अनिल बंकर यांनीही आरोग्य पर्यटनातील संधींवर सादरीकरण केले. तसेच, आरोग्य पर्यटनातील संधी, आव्हाने, प्रशिक्षण, रोजगार, गुंतवणूक, सरकारी धोरणांवर मान्यवरांनी परिषदेत सखोल चर्चा केली.

राज्याचे कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप झाला. या वेळी राज्य सरकारच्या सल्लागार श्‍वेता शालिनी यांनी आरोग्य क्षेत्रात सरकारतर्फे सुरू असलेल्या अभिनव प्रयत्नांची माहिती दिली. आयुष्यमान भारत योजनेद्वारे आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार असून आरोग्य पर्यटनाला राज्य सरकारचा धोरणात्मक पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Wellness Hub in the State Jayakumar Raval