दोन्ही राजे नवी मुंबईत एकत्र येणार; उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ठरणार मराठा आरक्षणाची रणनिती

सुजित गायकवाड
Tuesday, 6 October 2020

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत रणनिती ठरवून अधिक व्यापक रूप देण्यासाठी उद्या(ता. 7) नवी मुंबईत उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एका राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत रणनिती ठरवून अधिक व्यापक रूप देण्यासाठी उद्या(ता. 7) नवी मुंबईत उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एका राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनात ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

मुंबईत रेस्टॉरंट्स सुरू; पण मद्यविक्रीसाठी वेळ काय?

मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे याकरीता मराठा क्रांती मोर्चातर्फे 2016 पासून राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. राज्यभरात मोठ्यासंख्येने ऐतिहासिक मूक मोर्चे काढण्यात आले. यादरम्यान तत्कालिन सरकारने उपसमिती गठित करून त्या समितीच्या माध्यमातून सर्व घटकांशी चर्चा व अभ्यास करून मराठा समाजाला एसईबीसी या प्रवर्गाअंतर्गत 16 टक्के आरक्षण जाहीर केले. सदर आरक्षण विधानसभा व विधान परिषदेत मंजूर करून राज्यपालांमार्फत आरक्षणाचा आदेश काढला. याबाबत मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर मराठा समाजाला शिक्षणासाठी 12 टक्के व नोकरीसाठी 13 टक्के आरक्षण न्यायालयाने पारीत केले. मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश देण्यात आला.

सुशांत मृत्यू प्रकरण: मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी १४ जूनपासून तब्बल ८० हजार फेक अकाऊंट्स

दरम्यान राज्यभरातील मराठा समाजातून संतापाची लाट उसळली आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तूर्तास स्वतःच्या जबाबदारीवर मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण द्यावे. अशी मागणी मराठा समाजातर्फे केली जात आहे. या मागणीवर चर्चा करून आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी माथाडी भवनात 7 ऑक्‍टोबरला बुधवारी बैठकीचे आयोजन केले आहे. याबैठकीला उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayan Raje and Sambhaji Raje bhosale in navi mumbai for maratha reservation