युतीच्या कोणत्याही बंडखोराला थारा नको

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

ठाण्यातील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

ठाणे : युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे चित्र रंगवले जात आहे, पण असा कोणत्याही बंडखोराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. युती ही घट्ट असून ती अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी अपप्रचाराला बळी न पडता केवळ धनुष्यबाण आणि कमळ ही दोन चिन्हेच लक्षात ठेवा, असे आवाहन करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे नेते हे बंडखोरांसोबत नसल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनेचे पालकमंत्री आणि कोपरी पाचपाखाडी येथील उमेदवार एकनाथ शिंदे, ओवळा माजिवडा येथील प्रताप सरनाईक, कळवा मुंब्रा येथे दीपाली सय्यद आणि ठाण्यातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी वागळे इस्टेट येथे आज रात्री झालेल्या सभेत ते बोलत होते.

स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्ष अग्रणी होता हे कोणीही अमान्य करणार नाही. त्या वेळी ऐकलेला एक किस्सा आहे की एका तरुणीने भररस्त्यात सत्याग्रहात उतरण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आपल्याजवळील दागिने तिने एका तरुणाकडे दिले आणि सांगितले, की हे दागिने माझ्या घरी पोचव. कारण त्या तरुणाने गांधीटोपी घातली होती. एवढा काँग्रेसवर त्या काळातील लोकांचा विश्‍वास होता, पण त्यानंतर काँग्रेसने केवळ सत्तेसाठी सर्व काही हा विचार अमलात आणल्यामुळेच काँग्रेस आता विरोधी पक्ष म्हणूनही टिकू शकला नसल्याची टीका या वेळी उद्धव यांनी केली.

आजच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न नाही तर कोणाला भारतरत्न द्यायचा, असा प्रश्‍न त्यांनी केला. सावकरांच्या विरोधात असलेल्या वृत्तीला विरोध करण्याची ही वेळ आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला राम मंदिर हवे आहे.

स्थिर सरकारसाठी पाठिंबा
गेल्या वेळी भाजपला पाठिंबा दिला नसता तर सरकार अस्थिर झाले असते. त्यामुळे भाजपबरोबर राज्याचे नुकसान झाले असते. ते टाळण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीने अदृश्‍य हाताने पाठिंबा देण्याचे प्रयत्न केले होते, पण त्याचा राज्याच्या विकास कामांवर परिणाम झाला असता. त्यामुळेच स्थिर सरकारसाठी शिवसेना भाजपसोबत राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray in Thane for campaign Rally