उल्हासनगर महानगरपालिकेचा वराती मागून घोडे काढण्याचा प्रताप

दिनेश गोगी
गुरुवार, 5 जुलै 2018

उल्हासनगर : भ्रष्टाचाराच्या विरोधात  दुपारी अंत्ययात्रा निघाली असतानाच,या अंत्ययात्रेला स्थगित करण्याचे पत्र मध्यरात्री देऊन उल्हासनगर पालिकेने उपोषणकर्त्याची थट्टा करताना वराती मागून घोडे काढण्याचा प्रताप केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगर : भ्रष्टाचाराच्या विरोधात  दुपारी अंत्ययात्रा निघाली असतानाच,या अंत्ययात्रेला स्थगित करण्याचे पत्र मध्यरात्री देऊन उल्हासनगर पालिकेने उपोषणकर्त्याची थट्टा करताना वराती मागून घोडे काढण्याचा प्रताप केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये मिळालेल्या तब्बल 387 दस्तावेज्यांच्या घबाडा बाबत कारवाई करावी,गुन्हा दाखल करून पद रद्द करावे यासोबत विविध विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणी साठी माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चार दिवसांपासून चक्क स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.काल दुपारी मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्त उल्हासनगर समितीच्या वतीने स्मशानभूमी ते पालिका अशी भ्रष्टाचाराची अंत्ययात्रा काढण्यात आली.

मात्र दुपारी निघालेल्या या अंत्ययात्रेची धक्कादायक दखल पालिकेने रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी घेतली.पालिकेच्या वर्ग 3 च्या कर्मचाऱ्याने उपोषणकर्ते दिलीप मालवणकर यांना पत्र देऊन आयोजित अंत्ययात्रा स्थगित करण्याची आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली.वराती मागून घोडे काढण्याचा या प्रकाराचा मालवणकरांनी त्याच पत्रावर शेरा मारून समाचार घेतला.त्यात समितीने केलेल्या सर्व मागण्या ह्या महापालिका अधिनियम व संविधानाच्या चौकटीत आहेत.त्यावर निर्णय घेणे आपल्या अधिकार क्षेत्रात असताना पत्रात त्याबाबत अवाक्षरही काढलेले नाही.

उपोषणाचा तिसरा दिवस असताना त्याची दखल घेण्या ऐवजी या विषयासाठी सक्षम अधिकारी पाठवण्या ऐवजी वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यास पार पडलेली अंत्ययात्रा स्थगित करण्याकरिता मध्यरात्री पाठवणे म्हणजे उपोषणकर्त्याची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप मालवणकर यांनी पत्रात मारलेल्या शेऱ्यात केला आहे.

दरम्यान मालवणकरांना दिलेल्या पत्रात भदाणे यांच्या नावाचा काडीमात्रही उल्लेख नाही.काल सायंकाळी उशिरा पर्यंत चाललेल्या महासभेत मालवणकर यांच्या उपोषण स्थळी भेट देण्याची विनंती महापौर मीना आयलानी यांनी आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली होती.मात्र पाटील तिथे गेलेच नसल्याने हा देखील चर्चेचा विषय बनला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ulhasnagar municipal corporation