उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज निलंबित

दिनेश गोगी
सोमवार, 9 जुलै 2018

उल्हासनगर : मागच्या महिन्यात उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्याशी संबंधित नसलेले दस्तावेज मिळाले होते. याप्रकरणी भदाणे यांनी दिलेला खुलासा हा असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विभागीय चौकशीचा निर्णय घेण्यात येत असल्याचे आदेश आयुक्त गणेश पाटील यांनी दिले आहेत.

उल्हासनगर : मागच्या महिन्यात उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्याशी संबंधित नसलेले दस्तावेज मिळाले होते. याप्रकरणी भदाणे यांनी दिलेला खुलासा हा असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विभागीय चौकशीचा निर्णय घेण्यात येत असल्याचे आदेश आयुक्त गणेश पाटील यांनी दिले आहेत.

मे महिन्यात भदाणे हे जवळपास पंधरा दिवसांच्या रजेवर गेले होते. मात्र त्यांनी त्यांच्या कॅबिनची चावी पालिकेत जमा करण्याऐवजी घरी ठेवली होती.याची तक्रार रिपाइं आठवले गटाचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे करताना भदाणे यांच्या कॅबिनमध्ये वादग्रस्त फाईली असण्याची आणि त्या गायब करण्याची शक्यता असल्याने कॅबिन सील करण्याची मागणी केली केली. कॅबिन सील करण्यात आली आणि महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक भगवान भालेराव, मनोज लासी यांच्या उपस्थितीत 30 मे रोजी सील केलेली कॅबिन उघडण्यात आली. 30-31 मे आणि 2 जून असे तीन दिवस भदाणे यांच्या कॅबिनची झाडाझडती घेण्यात आल्यावर त्यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे उपआयुक्त पदाची ओळखपत्र,कोरे धनादेश, विविध अधिकाऱ्यांच्या पदाची शिक्के, अनेक विभागाच्या फाईली असे 387 दस्तावेज मिळून आले होते.

याप्रकरणी 12 जून रोजी भदाणे यांना पालिकेने नोटीस बजावून मिळालेल्या दस्तावेजांचा खुलासा मागितला होता. भदाणे यांनी 20 जूनला खुलासा दिला होता. मात्र सव्वा महिना उलटून गेल्यावरही भदाणे यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने कॅबिन उघडताना पंच असलेले माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणाला बसले होते. मात्र पाच दिवसांच्या उपोषणा नंतर मालवणकर यांची प्रकृती खालावली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या जागी पीआरपीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनी उपोषण सुरू ठेऊन भदाणेच्या विरोधातील आंदोलन सुरू ठेवले होते.

दरम्यान भदाणे यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्याशी संबंधित नसलेल्या संचिका आढळून आल्या आहेत. त्यात कर विभागाशी संबंधित धनादेश लेखा शाखेकडे जमा केले नाही, संबंधित नसलेले इतर पदांचे शिक्के, नगरविकास महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक नसलेले उपआयुक्त पदाचे विना स्वाक्षरीचे ओळखपत्र, शिक्षण विभागाचे ठेकेदाराची स्वाक्षरी असलेले कोरे बिले यांचा समावेश आहे. याप्रकरणी भदाणे यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त गणेश पाटील यांनी दिली.

भदाणेसाठी शापित ठरले विशेष कार्य अधिकारी पद
तत्कालीन आयुक्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांची विशेष कार्य अधिकारी या पदावर नियुक्ती केली होती. या पदा अंतर्गत त्यांच्यांकडे अनधिकृत बांधकाम विरोधी पथक प्रमुख, पाणी पुरवठा, शिक्षण विभाग असा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. मात्र हे असंवेधानिक पद असल्याच्या तक्रारी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक भगवान भालेराव, मनोज लासी, माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी केल्या होत्या. वणवा समता परिषदचे अध्यक्ष निलेश पवार यांनी थेट राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. निंबाळकर यांची बदली झाल्यावर आणि त्यांच्या जागी गणेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यावर एका महिन्यानंतर पाटील यांनी भदाणे यांना अतिरिक्त कार्यभारातून मुक्त केले. हेच पद भदाणे यांच्यासाठी ग्रहण ठरल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ulhasnagar Municipal Public Relation Officer Yuvraj suspended