भीक मागून महिलेने भरला हजारोंचा थकीत कर

दिनेश गोगी
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

आजची घटना हृदयस्पर्शीच होती. भीक मागून आणि जमवाजमव करून कर भरून कमल सपकाळ यांनी एक आगळंवेगळं उदाहरण समोर ठेवलं आहे. 
- राजेंद्र निंबाळकर, आयुक्त

उल्हासनगर - झोपडीतला तोडका-मोडका संसार. एक वेळचं पोट भरण्याचीही भ्रांत. नवरा नाही. मुलगा आहे, तोही अपंग. बिछान्यावर खिळलेला. त्याच्यासह स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्याने भीक मागून मिळेल त्यातून दोन घास पोटात ढकलायचे, असा तिचा रोजचा दिनक्रम. त्यातच डोक्‍यावर १० वर्षांपासूनची ३६ हजारांची कर थकबाकी. या परिस्थितीतही खचून जाऊन हार न मानता तिचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच तिला पालिकेने कर भरण्यासाठी केलेली जनजागृती आणि दिलेल्या सवलतींची माहिती मिळाली अन्‌ आज नाही तर कधीच नाही, असे म्हणत तिने कर भरण्याचा निर्धार केला. भीक मागून जमवलेल्या २२०० रुपयांसह थेट पालिकाच गाठली. मनसे कामगार संघटनेच्या पुढाकारातून तिने सवलत मिळून राहिलेला २२ हजार ९८२ रुपयांचा कर भरला आणि आयुक्तांसह पदाधिकारीही काही क्षण गहिवरून गेले. कमल सपकाळ असे या महिलेचे नाव आहे. आयुक्तांनीही त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

सी ब्लॉक परिसरात २० वर्षांपासून राहणारी कमल भीक मागूनच स्वतःसह मुलाची गुजराण करतात. मुलगा अपंग असून तो बिछान्यावरच असल्याने त्याच्यासाठीच त्यांचा सर्व खटाटोप सुरू आहे. कसेबसे दिवस ढकलत असलेल्या कमल यांच्यावर १० वर्षांपासून ३६ हजार रुपयांचा कर थकीत होता. त्यांना तो भरायचा होता; पण जिथं खायलाच पैसे नाहीत तिथं कर कोठून भरणार; पण कमल यांना पालिकेच्या अभय योजनेची माहिती मिळाली. या योजनेंतर्गत कर भरल्यास ७५ टक्के सवलत मिळत असल्याचे समजताच भीक मागून जमवलेल्या २२०० रुपयांसह त्या पालिकेत आल्या. तिथे एवढ्या पैशात काहीच होऊ शकत नसल्याचे सांगत काहींनी त्यांना मनसे कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. थोरात यांच्याकडे गेल्यावर एवढ्या कठीण प्रसंगातही कमल यांनी कर भरण्यासाठी घेतलेला पुढाकार पाहून थोरात यांनी स्वतः ५ हजार रुपये देऊन काही हितचिंतकांना मदतीसाठी हाक दिली. पाहता पाहता कुणी पाच, कुणी दोन, कुणी हजार अशी आर्थिक मदत दिली. पालिकेनेही १८ हजारांची सवलत दिली. त्यानंतर जमा झालेल्या २२ हजार ९८२ रुपयांसह थोरात यांनी कमल यांना आयुक्तांकडे नेले. तिथे निंबाळकर यांनी कराची रक्‍कम स्वीकारली.

(ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियांनुसार बातमीतील चुकांची दुरुस्ती केलेली आहे. चुकीबद्ल दिलगीर आहोत : ई सकाळ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ulhasnagar news women fill tax to Begging

टॅग्स