खारघरमध्ये अघोषीत "पाणीबाणी'; गेले दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा

खारघरमध्ये अघोषीत "पाणीबाणी'; गेले दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा

नवी मुंबई : खारघर नोडमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याला दाब नसल्यामुळे रहीवाशी सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्‍या कोरड्या पडत आहेत. खारघरमधील सेक्‍टर 11, 12, 13, 21, 24, 23 बी आदी सेक्‍टरमधील रहीवाशी परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. याबाबत सिडकोच्या खारघर येथील कार्यालयात रहीवाशांनी वारंवार तक्रारी दिल्या आहेत. त्यानंतरही काहीच फरक पडत नसल्याने रहीवाशी मेटाकुटीला आले आहेत.

21 व्या शतकातील स्मार्ट सिटीचे मॉडेल म्हणून सिडकोने तयार केलेल्या खारघर शहराकडे पाहीले जाते. हेटवणे धरणातून या शहराला 60 एमएलडी पाणी पुरवठा होतो. परंतू या शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात अद्याप सिडकोला यश आलेले नाही. खारघरमध्ये दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती आणि या इमारतींमधील वाढती लोकसंख्या पाहता सद्य पुरवठा होत असलेले पाणी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत जलवाहिन्याचे प्रश्‍न कायम असल्यामुळे खारघरचे पाणी टंचाईचे ग्रहण सुटलेले नाही. गेल्या दहा दिवसांपासून खारघरमधील विविध सेक्‍टर्समध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची ओरड नागरीकांकडून केली जात आहे.

पूर्वी सकाळी येणारे पाणी आता थेट रात्रीच्या सुमारास होत आहे. कधीकाळी पाण्याची वेळ संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यानची होती. मात्र आता त्यात बदल होऊन थेट रात्री 9 वाजताच्या सुमारास पाणी पुरवठा होतो. परंतू पाण्याला दाब नसल्यामुळे इमारतींच्या टाक्‍या भरत नाहीत. टाक्‍यांमध्ये अर्धवट पाणी असल्यामुळे नेमके सकाळी कार्यालयात जाण्याच्या वेळेस अंघोळी व स्वच्छता करताना पाणी संपून जाते. वेळेवर पाणी मिळत नसल्याने काही सोसायट्यांनी नाईलाजास्तव पाण्याचे टॅंकर मागवण्यास सुरूवात केली आहे. सद्या बहुतांश लोकांचे घरातूनच काम आणि मूलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने घरात पाण्याचा वापर वाढला आहे. परंतू कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक मेटाकुटीला आले आहेत.

तक्रारींकडे दूर्लक्ष
खारघरमधील सकाळ एम्प्लॉईज सोसायटी, राहूल अपार्टमेंट आदी सोसायट्यांनी पाणी कमी दाबाने येत असल्याच्या लेखी तक्रारी सिडकोकडे केल्या आहेत. परंतू त्यानंतरही सुधारणा झाली नाही. पाणी कमी दाबानेच येत आहे. त्यामुळे सिडको तक्रारींकडे दूर्लक्ष करते की काय असा प्रश्‍न नागरीकांकडून उपस्थित होत आहे.

बऱ्याचदा जलवाहिन्या रिकाम्या राहील्या की पाणी भरण्यास वेळ लागतो. तसेच काही ठिकाणी जलवाहिन्या दुरूस्तीच्या समस्या आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा होण्यास काय कारण हे पाहून सूधारणा केली जाईल.
राजन धायटकर,
कार्यकारी अभियंता, सिडको

Unannounced water flood in Kharghar low pressure water supply for last ten days

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com