चक्क उल्हासनगर महापालिकेची  शाळा पाडून अनधिकृत बांधकाम!

दिनेश गोगी
Sunday, 16 August 2020

बोगस कागदपत्रांच्या आधारे चक्क महानगरपालिकेची बंद असलेली शाळा तोडून त्यावर बांधकाम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शाळा पाडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

उल्हासनगर ः बोगस कागदपत्रांच्या आधारे चक्क महानगरपालिकेची बंद असलेली शाळा तोडून त्यावर बांधकाम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शाळा पाडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, शिवसेनेला ही माहिती समजताच त्यांनी धाव घेऊन बांधकामाची देखरेख करणाऱ्याला मारहाण केली. या अनधिकृत बांधकामाविषयी सर्वपक्षीय एकवटले असून सोमवारी आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. 
महापालिकेची हिंदी माध्यमाची शाळा क्रमांक 3 ही बेवास चौक उल्हासनगर 2 मध्ये असून शाळेचे नाव राणी लक्ष्मीबाई आहे. पटसंख्या नसल्याने आणि मोडकळीस आल्याने बरीच वर्षे शाळा बंद आहे. शनिवारी काही भूमाफियांनी या शाळेचे संपूर्ण बांधकाम तोडून शाळेतील सर्व सामान नेले. तसेच तेथे नवीन बांधकाम करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी या प्रकाराची माहिती सोशल माध्यमातून दिली. ही माहिती शिवसेना शहरप्रमुख व पालिकेतील सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांना समजताच त्यांनी उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, उपविभागप्रमुख विनोद सालेकर, शाखाप्रमुख सुरेश पाटील, आदेश पाटील यांच्याशी बांधकामाच्या ठिकाणी धाव घेतली आणि बांधकामाची देखरेख करणाऱ्याला मारहान करून पळवून लावले. 

- सर्वपक्षीय एकवटले 
मेलेल्या व्यक्तीच्या नावाने बोगस कागदपत्रांच्या आधारे या शाळेची सनद काढल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात उद्या आयुक्त डॉ. राजा दयानिधी, प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांची भेट देऊन जर सनद देण्यात आली असेल, तर ती तात्काळ रद्द करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. उपमहापौर भगवान भालेराव, स्थानिक भाजप नगरसेविका जया माखिजा, यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ, मनसे आयुक्तांची भेट घेणार आहेत. 

शाळा पालिकेच्या मालकीची असून ती मालकीचीच राहणार आहे. याबाबत अनधिकृत बांधकाम नियंत्रक, सहायक आयुक्त यांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
युवराज भदाणे, माहिती जनसंपर्क अधिकारी, उल्हासनगर महापालिका 

Unauthorized construction by demolishing municipal schools

 

( संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized construction by demolishing municipal schools