Unmasking Happiness|पोस्ट कोविड काळात 'बायपोलर डिसऑर्डर'वर लक्ष द्या

मिलिंद तांबे
Friday, 22 January 2021

पोस्ट कोविड रुग्णांना 'बायपोलर डिसऑर्डर'ची समस्या जाणवू लागली आहे. अशा रुग्णांसाठी पोस्ट ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्णांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन करण्यात येत आहे.

मुंबई: पोस्ट कोविड रुग्णांना 'बायपोलर डिसऑर्डर'ची समस्या जाणवू लागली आहे. आपल्याला कोविड होऊन गेल्याने समाज आपल्याला कशी वागणूक देईल अशी चिंता यांना सतावत असते. अशा रुग्णांसाठी पोस्ट ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्णांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन करण्यात येत आहे. यामुळे अनेक रुग्णांना या आजारातून बाहेर पडण्यास मदत झाली असल्याचे मनोविकार तज्ज्ञ डॉ शिवांगी पवार यांनी सांगितले.

रुग्ण कोव्हिडमुक्त झाला तरी त्याला मनात सतत भीती वाटत राहते. आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला कशी वागणूक देईल याचा ताण त्या व्यक्तीवर खूप जास्त असतो. काही रुग्णांना कोविड मुक्त झाल्यानंतरही समाजात चूकीची वागणूक दिली जात असल्याने अशा रुग्णांचे शारिरीक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. काही रुग्णांना झोप येत नाही, सतत बेचैनी असते, दिवसभर मनात विचार येत असतात. अशावेळी डॉक्टरांना जाऊन भेटावं असे डॉ शिवांगी पवार सुचवतात. 

कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांना ताण सहन न होणे, शारीरीक थकवा, झोपेचं वेळापत्रक बिघडणे, स्नायूंची हानी, भूक न लागणे असे लक्षणीय बदल आढळून आले आहे. कोरोनानंतर झालेल्या या बदलांमुळे नैराश्य, निद्रानाश यासारखे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. विविध अभ्यासानुसार शरीराला पुरेसा सुर्यप्रकाश न मिळाल्याने जीवनसत्त्वाची कमतरता मानसिक विकारांशी उद्भवत आहे. त्यामुळे नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, ओसिडी सारखे मानसिक आरोग्याशी संबंधित आजार वाढल्याचे दिसून येत आहे, असे आजार जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटची कमतरतेमुळे उद्भवू शकतात. तसेच बर्‍याच अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक व्यक्ती नैराश्याने ग्रासले आहेत. यामागचे कारण म्हणजे व्हिटॅमिन डी रिसेप्टर्स संपूर्ण मानवी मेंदूमध्ये पसरलेले आहेत आणि त्यातील निम्न पातळी ही आपल्याला मानसिक विकारांचा बळी ठरवू शकते असा इशारा ही डॉ शिवांगी पवार यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिटॅमिन डी ची कमतरता ही जागतिक आरोग्य समस्या आहे आणि त्यातील उच्च किंवा कमी पातळी या समस्येचे कारण ठरु शकते. आपल्याला आहार किंवा पूरक आहारांद्वारे ड जीवनसत्वाचे योग्य प्रमाणात सेवन करण्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे. कमी व्हिटॅमिन डी केवळ आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करत नाही तर उच्च रक्तदाबाशी देखील जोडला जातो. व्हिटॅमिन डीची निम्न पातळी हायपरटेन्शनशी जोडली जाते. अशा प्रकारे, योग्य व्हिटॅमिन डी चे योग्य प्रमाणात सेवन करणे उच्च रक्तदाबाची समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकते असे ही डॉ शिवांगी पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा- श्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशातही शिवसेना लढवणार निवडणुका

'बायपोलर डिसऑर्डर' हा मनोविकाराचा एक प्रकार आहे. यात मन एखाद महिना किंवा एखाद वर्ष अत्यंत उदास किंवा आत्यंतिक आनंदी राहते. उदासपणामुळे मनात सतत मोठं मोठे विचार येतात. हा आजार 100 पैकी एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो. 14 ते 19 वर्षातील व्यक्तींना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. हा आजार महिला आणि पुरुष या दोघांमध्ये समान प्रमाणात आढळतो.

------------------------------------

(संपादन - पूजा विचारे)

Unmasking Happiness attention bipolar disorder during post covid period mumbai news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unmasking Happiness attention bipolar disorder during post covid period mumbai news