Unmasking Happiness| पोस्ट कोविड मानसिक आजारात वाढ 

Unmasking Happiness| पोस्ट कोविड मानसिक आजारात वाढ 

मुंबई: पोस्ट कोविड प्रकरणात मानसिक आजारात वाढ झाल्याचे दिसते. 'सोशियल आयसोलेशन'मुळे एकटेपणाची भावना वाढीस लागली असून अशा व्यक्ती च्या मनात सतत आत्महत्येचे विचार ही येऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींवर तात्काळ मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे गरजेचे असायचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ विभावरी पाटील यांनी दिला आहे.

'सोशियल आयसोलेट'मुळे समस्या वाढल्या

पोस्ट कोविड बऱ्याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. कोविड काळात लोकांना  'सोशियल आयसोलेट' व्हावे लागले. अनेकांना काही महिने घरात थांबावे लागले. यामुळे व्यक्तीची 'सोशियल लाईफ' थांबली. माणसांशी येणारा संबंध कमी झाला. एकटेपणामुळे व्यक्तीची घुसमट होऊ लागली. मात्र त्याला आपले दुःख किंवा अडचणी कुणाला सांगता आल्या नाहीत. मित्रांशी,नातेवाईकांची सामोरा समोर चर्चा करता आली नाही. त्यामुळे 'सोशियल सपोर्ट' कमी झाला. 

'सोशियल स्पोर्ट' कमी झाला

'सोशियल सपोर्ट' कमी झाल्याने 'ट्रेस लेव्हल' वाढली. कोरोना काळात काही लोकांनी 'ऑन लाईन'च्या माध्यमातून संपर्क किंवा समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र 'ऑनलाइन' ही सध्या तरी आपल्याकडे योग्य पद्धत सिद्ध झालेली नाही. 'ऑनलाईन'साठी आपला मेंदू अजून तयार झालेला नाही. त्यामुळे आज ही आपल्यासाठी 'ऑनलाइन' चॅटिंग,मिटिंग, समुपदेशन या गोष्टी शक्य होत नाहीत. यासाठी अजून वेळ लागेल असे ही डॉ विभावरी पाटील म्हणाल्या.

नैराश्यात वाढ

लॉकडाऊन काळात लोकांना घरातच थांबावे लागले. ऑफिसला जाणे बंद झाले. त्यामुळे ताणतणाव मोकळे न होता अधिक वाढले. नैराश्य वाढले.  नैराश्यातून बाहेर पडलेल्या लोकांना दुसऱ्यांदा नैराश्यात जावे लागले. इतर आजाराबाबतची भीती वाढली. सर्दी ताप खोकला झाला तरी अशा लोकांना गंभीर आजारी असल्याचे वाटू लागते. चिंतेचे आजार जडू शकतात.

रिकामा वेळेचे नियोजन आवश्यक

लॉकडाऊनमुळे लोकांना घरी थांबावे लागले. लोकांकडे रिकामा वेळ बराच होता. मात्र या वेळेचे करायचे काय समजले नाही. ज्यांना आधीच काही मानसिक समस्या होत्या त्यांच्या मानसिक समस्याच अधिक वाढल्या. ज्यावेळी लॉकडाऊन काहीसे शिथिल झाले. त्यावेळी लोकं बाहेर पडू लागले. तेव्हा बाहेर पडून करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर होता.

दैनंदिन आयुष्य सुरू ठेवणे गरजेचे

मानसिक स्वास्थ्य जपायचे असेल तर आपलं दैनंदिन आयुष्य सुरु ठेवणे गरजेचे आहे. लवकर उठणे, व्यायाम करणे, संतुलित आणि वेळच्या वेळी आहार घेणे महत्वाचे आहे. 'आरोग्यदायी आयुष्य' जगण्यावर लोकांनी भर द्यायला हवा. काही भावनिक क्षण असतील तर ते इतरांशी 'शेअर' करा. काही समस्या / अडचणी असतील तर जवळच्या माणसांशी बोलून मन मोकळे करणे महत्वाचे आहे. आपल्या कुटुंबियांशी बोलणे महत्वाचे आहे. गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घ्या. 

स्क्रीनपासून लांब राहा

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना 'स्क्रीन' ची सवय जडली. खास करून तासनतास मोबाईल वर वेळ घालवणे अनेकांनी सुरू केले. याचा ही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. अनेकांना 'स्क्रीन'ची सवय जडली. मात्र त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करण्याच्या समस्या उद्भवल्या. चिडचिड वाढली, अनेक जण शीघ्रकोपी झाल्याचे समोर आले. 

ही आहेत लक्षणे

नैराश्य, उदास वाटणे, चिडचिड होणे, आरडा-ओरड करणे, कामात लक्ष न लागणे, झोप न येणे, अस्वस्थता वाढणे, रात्रीचे जागरण होणे, भूक न लागणे, हृदयाची धडधड वाढणे, तोंडाला कोरड पडणे, सतत चिंता वाटणे.

मानसिक आजारांबाबत अनभिज्ञ

अनेकजण मानसिक आजाराविषयी अनभिज्ञ असतात. आपल्याला मानसिक आजार किंवा तशी लक्षणे आहेत हे अनेकांना कळत नाही. घरातील लोकांना त्रास होऊ लागण्यास ते अशा व्यक्तींना डॉक्टरकडे घेऊन जातात. अलीकडे काही लोकांना मानसिक आजारांची जाणीव होऊ लागली आहे. ते डॉक्टरांशी 'ऑनलाइन' माध्यमातून संपर्क साधतात आणि समुपदेशन किंवा सल्ला घेतात. मात्र याचे प्रमाण शहरात अधिक आहे.

आजाराकडे दुर्लक्ष करू नका

आता दैनंदिन व्यवहार तसेच कामकाज बऱ्यापैकी सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेकजण नैराश्यातून बाहेर पडले असून मानसिक त्रास कमी झाला आहे. मात्र ज्यांना मानसिक आजाराची लक्षणे जाणवतात, जे अजून ही त्या त्रासातून बाहेर पडले नाहीत त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे महत्वाचे आहे. मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अशा व्यक्तीना अधिक नैराश्य येऊ शकते. त्यांना इतर आजाराची लागण होऊ शकते. त्यांच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येऊ शकतात किंबहुना अशा व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न देखील करू शकतात.
 
पोस्ट कोविड मानसिक आजारांमध्ये वाढ झाली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा व्यक्तींनी आपले कुटुंबिय किंवा मित्रांशी संवाद साधणे गरजेचे आहे. गरज पडल्यास मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा.
डॉ. विभावरी पाटील , मानसोपचार तज्ज्ञ, आयुष हॉस्पिटल

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Unmasking Happiness Corona Virus Increased post covid mental illness mumbai news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com