Unmasking Happiness | ऑक्‍सिजनच्या पुरवठ्याअभावी पायाला धोका

भाग्यश्री भुवड
Sunday, 17 January 2021

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ज्याप्रमाणे इतर आजारही उद्‌भवले, तसेच गॅंगरीन होण्याचे प्रमाणही रुग्णांमध्ये वाढले. त्याला ‘फेरिफ्युरल वॅस्क्‍युलर डिसीज’ असे म्हणतात.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ज्याप्रमाणे इतर आजारही उद्‌भवले, तसेच गॅंगरीन होण्याचे प्रमाणही रुग्णांमध्ये वाढले. त्याला ‘फेरिफ्युरल वॅस्क्‍युलर डिसीज’ असे म्हणतात. मुंबईतील रुग्णांत पोस्ट कोव्हिडमध्ये गॅंगरीन होण्याचे प्रमाण दोन टक्के आहे. कोरोनामुळे शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो, तसाच पायांच्या रक्तवाहिन्यांवर होतो. म्हणजेच कोरोनात पायांच्या दोन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात.

कोव्हिडमुळे शरीरात ऑक्‍सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामध्ये पायाच्या रक्तवाहिनीत गुठळी झाली तर त्याला गॅंगरनि म्हणतो. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धूम्रपानाची सवय असलेल्या रुग्णांमध्ये गॅंगरीनचे प्रमाण जास्त असते. याच समस्या कोव्हिडसाठीही घातक ठरतात. गॅंगरीन तात्काळ उद्‌भवणारा आजार नसून रक्तवाहिन्या जेव्हा हळूहळू बंद होतात, तेव्हा पायात वेदना सुरू होतात. एका पातळीनंतर रक्तवाहिन्या बंद होण्याचे प्रमाण खूप वाढते आणि त्यामुळे पायाला झालेल्या जखमा भरूनही येत नाहीत. त्यांचे
रूपांतर पुढे गॅंगरीनमध्ये होते. कोरोना काळात या प्रकारचे १६ रुग्ण केईएम रुग्णालयात दाखल झाले होते. त्यातही मधुमेह आणि संसर्ग वाढल्याने १६ जणांपैकी चार जणांचे पाय कापावे लागले. त्यापैकी एकाचा नंतर जीवही गेला. अन्य चार जणांवर अँजिओप्लास्टी करून उपचार करण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये भूक समस्या गंभीर​

पाय वाचवण्यासाठी अँजिओप्लास्टीचा पर्याय
गॅंगरीनमुळे पाय कापण्याची वेळ येऊ नये किंवा जास्तीत जास्त पाय वाचवता यावा, यासाठी अँजिओप्लास्टीचा पर्याय असतो. कोव्हिडमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यावर उपचार म्हणून अँजिओप्लास्टीमध्ये १५० मिलीमीटर लांबीचा आणि दोन मिलीमीटर व्यासाचा फुगा पायाच्या रक्तवाहिनीमध्ये टाकला जातो. अशाप्रकारे उपचार करून चार जणांचे पाय वाचवण्यात केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले.

हायपरबॅरिक ऑक्‍सिजनदेखील उपचार
पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार झाल्याने पुढील भागात रक्तपुरवठा बंद होतो. त्यातून संबंधित भागाला पोषक पदार्थ, ऑक्‍सिजन तसेच औषध पुरवठा होत नाही. त्यामुळे संसर्ग वाढत जातो. अशा वेळी हायपरबॅरिक ऑक्‍सिजन उपचार पद्धतीचा वापर करून बाहेरून ऑक्‍सिजन दिले जाते. म्हणजेच विशिष्ट दाबाने ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जातो, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

पायांच्या जखमांकडे दुर्लक्ष नको!
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन पायांना जखमा झाल्या असतील, तर त्यांना पुढील दोन ते तीन वर्षांत हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात येण्याची शक्‍यता वाढते. रक्तवाहिन्या बंद असल्यास मेंदू आणि हृदयाच्या नसाही बंद असू शकतात. त्यामुळे पायांच्या जखमांकडे दुर्लक्ष करू नये, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

गॅंगरीनची लक्षणे

  •  ५०० मीटर चालले की मांड्यांमध्ये गोळा येणे.
  •  चालल्यानंतर पाय दुखायला लागल्यानंतर एका जागी थांबल्यानंतर वेदना कमी होणे.
  •  अनेकदा न चालताच पाय दुखणे.
  •  कोणत्याही प्रकारची जखम झाल्यास ती चिघळत मोठी होते.

यावर उपाय काय?

  •  बदलत्या जीवनशैलीमध्ये नियंत्रण ठेवणे.
  •  उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपानावर नियंत्रण.
  •  रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वापर.
  •  कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधे.
  •  जखम जास्त चिघळल्यास अँजिओप्लास्टी.

 Unmasking Happiness Danger to the feet due to lack of oxygen supply peripheral vascular disease

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unmasking Happiness Danger to the feet due to lack of oxygen supply peripheral vascular disease