
. बस कंडक्टरना आता क्यूआर कोड स्कॅनरसह बॅजेस दिले जात आहेत जे प्रवाशांना कॅशलेस पेमेंट करण्यासाठी वापरता येणार आहेत.
आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत
मुंबई- बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुट्टे पैशांचा प्रश्न अखेर सुटला आहे. कारण बेस्ट बसनं आता सुट्ट्या पैशांमुळे उद्भवणाऱ्या समस्येवर मार्ग काढला आहे. बेस्टनं अखेर यूपीआय कॅशलेस व्यवहाराच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. बस कंडक्टरना आता क्यूआर कोड स्कॅनरसह बॅजेस दिले जात आहेत जे प्रवाशांना कॅशलेस पेमेंट करण्यासाठी वापरता येणार आहेत.
ही प्रक्रिया आता प्रायोगिक तत्त्वावर दोन बस डेपोमध्ये सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया कॅशलेस व्यवहारासाठी मार्ग सुलभ करेल आणि कोविड19 च्या दिवसात शारीरिक पैशाची देवाणघेवाण टाळता येईल.
कोरोनाच्या भीतीने, वाहनांच्या विक्रीने घेतला पिकअप! सार्वजनिक प्रवास टाळण्यावर भर
बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, ही प्रक्रिया करताना प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानाचा मार्ग सांगावा लागेल. कंडक्टर त्या ठिकाणाचं भाडं तपासून नंतर द्यावयाची असणारी रक्कम सांगेल. प्रवासी कोणत्याही ऑनलाइन पेमेंट पर्यायासह बॅज स्कॅन करू शकतात. एकदा बॅज स्कॅन झाल्यावर त्या अॅपमध्ये बस डेपो दर्शवण्यात येईल आणि कंडक्टरच्या बॅज क्रमांकासह देय रक्कम भरली जाईल.
16 जूनपासून दक्षिण मुंबईतील कुलाबा डेपोत प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर याची सुरूवात 26 जूनला वडाळा डेपोतही करण्यात आली. काही दिवसांनंतर ही प्रक्रिया सर्वच आगारात आणली जाईल. हा व्यवहार मोड बेस्ट अॅपपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे आणि स्वतंत्रपणे केला जाऊ शकतो.
ही पेमेंट प्रक्रिया अन्ड्रॉईड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. होणारे सर्व व्यवहार बस डेपोमध्ये केंद्रीकृत संगणकावर नोंदवले जातील. ज्याची नोंद वेगळी केली जाईल.
बेस्टला गेल्या काही काळापासून सुट्ट्या पैशांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागायचं. बेस्टमध्ये दररोज लाखो रुपयांची नाणी गोळा केल्या जातात. कोट्यवधी जमलेले सुट्टे पैसे आता मुंबईतल्या 27 बस डेपोच्या खोलीत तसेच पडून आहेत. इतकंच काय तर हे नाणी संपवण्यासाठी बेस्टनं आपल्या कर्मचाऱ्यांना पगारातला काही भाग चिल्लरच्या स्वरुपात दिला. तथापि, जर या क्यूआर कोड पद्धतीची चांगली जाहिरात केली गेली आणि ते क्लिक केले तर बेस्टला त्याची सर्वोत्कृष्टपणे मदत होईल.