मुंबईत बालकांच्या लसीकरणाचा वेग वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child vaccination

कोविडवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या टप्प्यात नुकताच १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईत बालकांच्या लसीकरणाचा वेग वाढणार

मुंबई - कोविडवर (Covid) मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या (Vaccination) टप्प्यात नुकताच १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचा (Children) समावेश करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांनी मात्र या लसीकरणात फारसे स्वारस्य दाखवलेले नाही, परंतु मुंबईतील या लसीकरणाचा वेग आता वाढणार असून पालिका सोमवारपासून कॉर्बेव्हॅक्स लस शहरातील जवळपास १०० केंद्रांवर उपलब्ध करणार आहे.

१२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी बुधवारपासून लसीकरण सुरू झाले आहे. या पहिल्याच दिवशी शहरातील केवळ १२ केंद्रांवर लस उपलब्ध करण्यात आली होती. सध्या ही लस केवळ पालिका आणि सरकारी केंद्रांमध्येच उपलब्ध झाली आहे, परंतु कॉर्बेव्हॅक्स बायोलॉजिकलच्या निर्मात्यांनी ही लस एका आठवड्यात खासगी आरोग्य सेवा प्रदात्यांसाठीही उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले आहे. त्यानंतर शहरातील किती खासगी रुग्णालये बालकांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात सहभाग घेतात हे समजेल.

मुंबईत गुरुवारपर्यंत १२ केंद्रांवर ५५७ बालकांचे लसीकरण करण्यात आले. मुलांच्या सुरू असलेल्या परीक्षा आणि मर्यादित केंद्रांमुळे या लसीकरणाला फारच कमी प्रतिसाद मिळाला. पालिकेच्या मते शहरात १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांची लोकसंख्या सुमारे ३.५ ते ५.५ लाख आहे.

शिबिरे आयोजित करण्याचा विचार

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी याबाबत म्हणाले, की बरेच विद्यार्थी परीक्षेला बसत असल्याने आम्हाला कमी प्रतिसादाची अपेक्षा होती. सोमवारपर्यंत कॉर्बेवॅक्सची उपलब्धता शहरातील सुमारे १०० केंद्रांवर असेल. आम्ही शाळांच्या संपर्कात आहोत. जर त्यांनी परवानगी दिली तर आम्ही शिबिरेही आयोजित करू.

लसीकरणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

- लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. रविशंकर म्हणाले, की पालकांकडून लसीकरणास कमी प्रतिसाद मिळत असल्याने आम्ही यात सहभागी होणार नाही. शहरातील किशोरवयीन लोकसंख्या पाहता पूर्णपणे लसीकरण अद्याप झालेले नाही. आम्ही लस खरेदी करून त्याला कमी प्रतिसाद मिळाल्यास रुग्णालयाचे नुकसान होईल.

- सूर्या चाईल्ड केअरचे सीईओ डॉ. भूपेंद्र अवस्थी म्हणाले, की आम्ही सुमारे एक लाख प्रौढांना लसीकरण केले आणि कोव्हॅक्सिनचे सुमारे दोन हजार डोस दिले आहेत, परंतु आता प्रतिसाद खूपच कमी आहे. आम्हाला इच्छा आहे, मात्र आम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करणार नाही.

- वाडिया रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की कोविडची भीती पालकांमध्ये जवळपास नगण्य आहे. किशोरवयीन (१५ ते १८ वय) लसीकरणासाठी आम्हाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्या १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण करण्याची आमची इच्छा नाही.