सांगा ना... जगायचं कसं?  वैदू समाजाची सरकारला आर्त हाक

उत्कर्षा पाटील : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

रेल्वेगाड्यांमध्ये बांगड्या-कानातले विकणे, धुणी-भांडी करणे किंवा सरळ भीक मागून गुजारा करणे, अशी कामे वैदू समाजातील लोक पूर्वीपासून करत आले आहेत. सध्याच्या कोरोनासंकटामुळे लॉकडाऊन असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ ओढवली आहे

मुंबई :  रेल्वेगाड्यांमध्ये बांगड्या-कानातले विकणे, धुणी-भांडी करणे किंवा सरळ भीक मागून गुजारा करणे, अशी कामे वैदू समाजातील लोक पूर्वीपासून करत आले आहेत. सध्याच्या कोरोनासंकटामुळे लॉकडाऊन असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. मुंबईत या समाजाच्या आठ वस्त्या आहेत; मात्र त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचलेली नाही. अनेकांकडे शिधापत्रिका किंवा अन्य कागदपत्रे नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे माय-बाप सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे, अशी आर्त हाक वैदू समाज देत आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत कित्येक वर्षांपासून भटक्‍या-विमुक्त जमातीमधील वैदू समाजाचे वास्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित असल्यामुळे लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाविषयी व्यवस्थित समजत नाही. त्याबाबत त्यांच्यात जागरुकता नाही, अशी माहिती वैदू समाजात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या दुर्गा गुडिलू यांनी दिली. वैदू समाजामधील प्रत्येक कुटुंबांची अवस्था बिकट आहे. सर्वच लोक बेरोजगार झाले आहेत. अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे कामही करता येत नाही. प्रत्येकाची परिस्थिती दयनीय आहे. लहान घरात सात ते 15 माणसे राहतात. त्यांच्याकडील धान्य, पैसे सर्व काही संपले आहे, असे दुर्गा म्हणाल्या. 

आमच्या मदतीला आतापर्यंत कोणीही आले नाही. राजकीय पुढारी आणि जात पंचायतीने आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. समाजातील वृद्धांवर तर उपासमारीमुळे जीव जाण्याची वेळ येऊ शकते. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात मी काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आमच्या वस्तीतील 838 कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले. त्यासाठी बजाज इलेक्‍ट्रिकल्स, भावना दप्तरी, भारत सीरम अँड व्हॅक्‍सीन्स, मनीष मेहता यांनी मदत केली, असे दुर्गा यांनी सांगितले. आता लॉकडाऊन वाढला आहे. त्यामुळे लोकांकडील अन्नधान्य संपले असेल. आता त्यांनी काय खायचे आणि कसे जगायचे, असा सवालही दुर्गा यांनी केला. 

रुग्ण औषधांविना 
मुंबईत जोगेश्‍वरी, गोरेगाव, बोरिवली, दहिसर, विरार, कळवा, ठाणे, विठ्ठलवाडी, मानखुर्द, विक्रोळी, वरळी, वाशी, पनवेल या ठिकाणी वैदू समाजाच्या वस्त्या आहेत. वस्त्यांमध्ये अनेक रुग्णही आहेत, त्यांच्याकडील औषधे संपली आहेत. आता सरकारी दवाखाने-रुग्णालयांत पोहोचणे शक्‍य नाही आणि दुकानातून औषधे घेणे परवडणारे नाही. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

स्त्रियांचा आणखी कोंडमारा 
आता दिवसभर घरातील सर्व जण एकत्र असतात; त्यामुळे वाद-भांडणे होतात. अनेक घरांत स्त्रियांना मानसिक आणि शारिरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. उद्या परिस्थिती सुधारली, तरी या समाजातील जीवन पूर्ववत व्हायला वेळ लागेल, इतके ते विस्कळीत झाले आहे, असे दुर्गा गुडिलू म्हणाल्या. 

सांगा, जगायचं कसं? 
जोगेश्‍वरी येथे राहणारे ताई शिवरलु यांच्या कुटुंबात 16 जण आहेत. हे सर्व जण छोट्याशा घरात राहतात. आज त्यांच्यापैकी कोणाच्याही हाताला काम नाही. मुत्ताव्वा शिर्के ही 75 वर्षांची दमेकरी वृद्धा भीक मागून पोट भरते; लॉकडाऊनमुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaidu community in crisis due to lockdown