वज्रेश्वरी - श्रमजीवींच्या स्वातंत्र्याचा जल्लोष 

ganeshpuri
ganeshpuri

वज्रेश्वरी - देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र साजरा केला गेला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा झाला. जे आदिवासी कष्टकरी स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत, अशा निरपेक्ष आदिवासी कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने येऊन गणेशपुरीत आपल्या राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ही उपेक्षित कष्टकरी देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी धारातीर्थी पडलेले हुतात्म्यांना दिलेली मानवंदना आहे असे गौरवोद्गार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी काढले. यावेळी वज्रेश्वरी पासून तब्बल तीन तास रॅली ने गणेशपुरी पर्यंत येऊन झेंडावंदन केले. 

आज पर्यंत ज्यांच्या झोपडीमध्ये स्वातंत्र्याचा प्रकाश पोहचला नाही, आजही ज्यांना पोटभर अन्न नाही,पुरेसा रोजगार नाही ज्यांना केवळ वेदना, भूक, बेरोजगारी आणि दारिद्र्यच दिले आशा कष्टकरी बांधवांचा हा अनोखा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  या उत्सवात पालघर, ठाणे ,रायगड आणि नाशिक जिल्हयातील सुमारे 25 ते 30 हजार सभासद सहभागी झाले होते, गेली 35 वर्षे अखंडपणे चढत्या आलेखाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव गणेशपूरी येथे होत असतो, 10 वर्षाच्या बाल बालकार्यकर्त्यांपासून तर 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच यात सहभागी होतात. एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासींचा एकत्र येऊन होत असलेला हा झेंडावंदन भारतातील एकमेव कार्यक्रम आहे.  

संघटना वेळोवेळी भुकेच्या रोजगाराच्या प्रश्नावर लढा देत आहे, त्या त्या वेळी सरकारने आश्वासन दिली आहेत, ही पूर्ण झाली नाही तर येत्या काळात सरकार विरोधी अत्यंत प्रखर लढा देण्यास आम्ही सज्ज असू असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने विवेक पंडित यांनी दिला.

सीमेवर देशासाठी लढताना हौतात्म्य पत्करकेले शाहिद मेजर कौतुभ राणे यांच्या सह विरपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाने आपल्या छातीची ढाल केली आहे म्हणून आपण देशात निर्धास्तपणे श्वास घेऊ शकतो अशी जाणीवही पंडित यांनी आपल्या मनोगतात सर्वाना करून दिली. यावेळी संघटनेच्या तरुणींनी सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचे चित्र उभे करणारे नाट्य यावेळी सादर केले.

श्रमजीवी संघटना गेली 35 वर्षे आदिवासी कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहे. या स्वातंत्र्य उत्सवाला एक क्रांतिकारी इतिहास आहे. संघटनेने जेव्हा काम सुरू केले तेव्हा स्वातंत्र्याला 35 वर्ष लोटलेले, मात्र स्वतंत्र भारतात देखील सावकारी गुलामगिरीच्या पाशात अडकलेल्या आदिवासींना स्वतंत्र शब्दाचा अर्थ सोडा साधा हा शब्दही त्यांच्या कानी कधी पडला नसल्याचे विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांच्या लक्षात आले. त्यानंतर जेव्हा त्यांनी या वंचितांना घेऊन झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर तो त्या काळच्या प्रस्थापित पुढारी आणि मालकधार्जिण्या सरकारने हा झेंडावंदन गुन्हा ठरवत पंडित दाम्पत्यासह नऊ कार्यकर्त्याना तुरुंगवास भोगावा लागला होता, स्वातंत्र्य भारतात देखील ह्या कार्यकर्त्यांनी कडवी झुंझ देत आपला स्वतंत्र्याचा  हक्क बजावला. त्यानंतर हा स्वातंत्र्य उत्सव अविरतपणे सूरू आहे.

ज्यांना या देशातील स्वातंत्र्योत्तर नेत्यांनी उपेक्षेशिवाय काहीही दिलेले नाही असे आदिवासी कष्टकरि कामगार स्वखर्चाने वाजत गाजत नाचत आनंदाची उधळण करित मिरवणुकीने वज्रेश्वरीहून गणेशपूरिला जातात. स्वातंत्र्य वीरांना अभिवादन करतात. त्यांच्या स्वप्नाची उजळणी करतात. दुसर्या स्वातंत्र्य लढ्यासाठी वचनबद्ध होतात. सरकारी स्वातंत्र्य दिन जुलुम जबरदस्तीने होताना आपण पहाता. तो एक उपचार वाटतो. गणेशपूरी मात्र जनतेच्या उत्स्फूर्त उत्सवाने स्वातंत्र्यमय होते.

या जनतेच्या स्वातंत्र्य उत्सवाची दखल फारशी घेतली गेली नसली तरी हा उत्सव साजरा करणार्यांना त्याची खंतही नाही.

वाजत गाजत नाचत अत्यंत आनंदात ही मिरवणूक पार पडली, देशात अनेक ठिकाणी मात्र बेगडी देश प्रेम उफाळून येताना दिसत असतांना घाम गाळणाऱ्या निरपेक्ष श्रमजीवी आदिवासींच्या या अनोख्या उत्सवात अनेक मान्यवर सहभागी झाले होते, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्यासह भारत - पाक युद्धात लढून जखमी झालेले मेजर रामराव लोंढे, उद्योजक आमिर तलाह मुखी यांसह गणेशपुरी उपविभागीय अधिकारी कृष्णत काटकर, गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेखर डोंबे, पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर, यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस आणि श्रमजीवी संघटनेच्या युवक स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था सांभाळत हा कार्यक्रम शांततेत आणि अतिशय शिस्तबद्धपणे पार पडला.

यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष स्व.जानू मेघवाले श्रमशाहीर पुरस्कार कवी विश्वनाथ पाटील यांना तर स्व.रमेश मळगावकर आदर्श कार्यकर्ता पुरस्कार छाया पागी यांना आणि स्व.रघुनाथ पंडित आदर्श कार्यकर्ता पुरस्कार राजेश चन्ने यांना संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com