esakal | असं झालं तर लसीकरण सुरूच करणार नाही- मुंबई महापालिका
sakal

बोलून बातमी शोधा

BMC-Chahal

असं झालं तर लसीकरण सुरूच करणार नाही- मुंबई महापालिका

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यातील कोरोना परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येऊ लागली आहे. कडक लॉकडाउन आणि लसीकरण याच्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मुंबईत वेगाने लसीकरण मोहिम हाती घेतली गेली आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण केलं जाणार आहे. पण मुंबई महापालिकेला जर लसीचा पुरेसा पुरवठा करणं शक्य असेल, तरच मुंबई महापालिका १ मेपासून नवीन लसीकरण मोहिम हाती घेईल. अन्यथा आम्ही १८ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण मोहिम सुरूच करणार नाही, असं रोखठोक मत मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: Lockdown ची दहशत! टॅक्सी चालकांनी उचललं टोकाचं पाऊल

"लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती, तेव्हा मुंबईत दिवसाला एक लाख लोकांना लसीकरण करायचं असा आमचा मानस होता. पण आम्हाला आमचं लक्ष्य फार काळ गाठता आलं नाही. लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच आता आम्ही थेट राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी चर्चा करणार आहोत. जर आरोग्य विभागाकडून लसीचा पुरेसा पुरवठा केला जाईल, असा विश्वास देण्यात आला तरच आम्ही १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करू आणि लसीकरण मोहिमही सुरू करू. पण जर लसीचा पुरवठा करणं शक्य होणार नसेल, तर लोकांना उगाचच रस्त्यावर उतरून गर्दी करायला लावण्यात काहीच अर्थ नाही", अशी स्पष्ट भूमिका चहल यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Sachin Waze Case: मनसुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

"अशी भूमिका घेतल्याने माझ्यावर मुंबईकर टीका करतील याची मला कल्पना आहे. त्यांच्या टीकेला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. पण मी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका विचार करून घेतली आहे. मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील ५० ते ६० लाख लोक आहेत. त्यामुळे अंदाजे १.२ कोटी लसींच्या डोसची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आम्हाला जोपर्यंत पुरेसा लससाठी मिळेल अशी खात्री दिली जात नाही, तोवर आम्ही १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरूवातच करणार नाही", असं चहल म्हणाले.

loading image
go to top