डाॅक्टर हवेत! पालिकांची आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच; अधिकाधिक पगाराची ऑफर

डाॅक्टर हवेत! पालिकांची आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच; अधिकाधिक पगाराची ऑफर



मुंबई : कोरोना काळात डॉक्टर आणि नर्सचा तुटवडा कायम जाणवत आहे. कोरोना संसर्गाचा धोका, त्यात कमी पगार या कारणांमुळे डाॅक्टरांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या डाॅक्टर, नर्सना जास्तीत जास्त पगाराची ऑफर देऊन आपल्याकडे ओढण्याचा विविध पालिका प्रशासनांनी सुरू केला आहे. या परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी मुंबई महापालिका अधिकाधिक पगार देऊन डॉक्टर आणि परिचारिकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. 

मुंबई महापालिका सध्या एमबीबीएस पदवीधरांना 80 हजार रुपये आणि एमडी आणि तज्ज्ञ डॉक्टरांना दरमहा 1 ते 2 लाख रुपये पगार देत आहे. दुसरीकडे, नवी मुंबई महापालिकेने नुकतेच जाहीरातीतून एमबीबीएस पदवीधारकांना 1.25 लाख आणि एमडी पदवीधारकांना अडीच लाख रुपयांची ऑफर दिली आहे. ठाणे महापालिका एमडींना अडीच लाख ते तीन लाख रुपयांची ऑफर देत आहे. त्यामूळे, मुंबईतील डॉक्टर्स येथे नोकरी करण्यासाठी धाव घेतील अशी भीती मुंबई महापालिकेला आहे. 

मुंबई पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पालिकेचे अनेक डॉक्टर व परिचारिका जास्तीच्या पगारासाठी ठाणे पालिका आणि नवी मुंबई पालिकेकडे जाण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे सावधगिरी म्हणून मुंबई पालिकाही या डॉक्टरांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, ठाणे महापालिका डाॅक्टर, नर्सना खासगी रुग्णालये, मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिकेपेक्षा जास्त पगाराची ऑफर देत आहे. 


नवी मुंबईत वाढत्या खाटांसाठी डाॅक्टर हवेत
नवी मुंबईत पालिकेने (एनएमसी) गेल्या आठवड्यात सिडको मैदानावरील 1000 पैकी 500 खाटांचे ऑक्सिजन खाटांमध्ये रुपांतर केले आहे. तसेच, नवीन कोव्हिड केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेने तीन ते चार जागाही पाहिल्या आहेत. पुढील टप्प्यात नवी मुंबईत  आणखी 500 खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालिका आयुक्त बांगर यांनी सांगितले. 

आम्हाला टप्प्याटप्प्याने बेडची संख्या वाढवताना अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे. पगार कसे द्यावे यावर विशेष अभ्यास करुन जाहिरातींचा आराखडा तयार केला गेला आहे. 18 जुलै रोजी एनएमएमसीने डॉक्टर आणि परिचारिकांसाठी एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये एमबीबीएस डॉक्टरांना 1.25 लाख रुपये, परिचारिकांना सुमारे 40,000 रुपये आणि एमडी विशेषज्ञांसाठी 2.5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.   सोमवारी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय, आम्ही नियुक्ती पत्र देण्यासही सुरुवात केली आहे.
- अभिजीत बांगर,
आयुक्त, नवी मुंबई पालिका

ठाणे पालिकेकडून सर्वाधिक आॅफर
दररोज भुलतज्ज्ञ, एमबीबीएस डॉक्टर आणि परिचारिकांची भरती करत आहोत. ज्यांना नियुक्ती पत्र मिळाले. त्यातील केवळ 60 टक्के ड्युटीवर रुजू झाले आहेत. उर्वरित अजून झालेले नाहीत. ठाणे महापालिका तज्ज्ञ डॉक्टरांना सर्वाधिक दरमहा 3 लाख रुपयांची ऑफर देत आहे, असे ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितले. तर, पालिकेत सोमवारी डॉक्टरांच्या वाढीव पगाराच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ.आर.एन.भारमल यांनी दिली.

मुंबईत रुग्णसंख्या वाढती; डाॅक्टर टिकायला हवेत
आम्ही दररोज कोरोना रुग्णांमध्ये वाढ बघत आहोत. सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचार्‍यांसह या रुग्णांचे व्यवस्थापन होऊ शकेल. मात्र, डाॅक्टरांनी नंतरही येथेच काम करावे म्हणून डॉक्टरांना जास्त पगार देण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मुंबई  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

राज्यातील परिचारिकांची पालिकेकडे धाव
युनायटेड नर्सेस असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील ग्रामीण आणि अंतर्गत भागातील अनेक परिचारिका ठाणे आणि नवी मुंबईत कामावर रुजू होत आहेत. मुंबईतही बर्‍याच परिचारिकांनी जास्त वेतनासाठी मार्च आणि एप्रिलमध्ये खासगी रुग्णालयातील नोकरी सोडून पालिका रुग्णालयात काम करायला सुरुवात केली आहे. 

कोणाकडे किती रुग्ण
आतापर्यंत 18,320 रुग्णांची नोंद असलेल्या ठाणे शहरात दररोज 300 ते 400 नवीन रुग्णांची नोंद आहे. तर, नवी मुंबईत आतापर्यंत 14,164 रुग्णांची नोंद झाली असून दररोज 300 ते 350 रुग्ण आढळत आहेत. मुंबईत आतापर्यंत एका लाखाहून अधिक रुग्ण सापडले असून दररोज 1200 ते 1500 नवीन रुग्णांची नोंद आहे.

----------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com