भाज्यांचे भाव कडाडले! कोरोनाने आधीच आर्थिक संकटात असलेल्या सर्वसामान्यांचे हाल सुरूच

प्रसाद जोशी
Wednesday, 30 September 2020

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनात कपात लागू झाली. असे असताना दररोज आहारातील भाज्यांचे भावही गगनाला भिडले असल्याने जगायचे कसे आणि खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे

वसई ः कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनात कपात लागू झाली. असे असताना दररोज आहारातील भाज्यांचे भावही गगनाला भिडले असल्याने जगायचे कसे आणि खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे. बहुतेक भाज्यांनी किलोला शंभरी गाठली असून हिरवा वाटाणा तर 400 रुपये किलो इतका महागला आहे. 

७ नंतरही दुकानं सुरु ठेवली; ठाण्यात ७२ दुकानांना टाळं, पालिकेची धडक कारवाई

वसई, नालासोपारा, विरार व नायगाव शहरात मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. बैठी घरे, चाळीत राहण्याचे प्रमाण जास्त आहे. मजुरीवर गुजराण करणारी कुटूंबे अधिक आहेत. शाकाहारी आहारात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांकडे जास्त कल असलेल्या नागरिकांना आता भाज्या घेणे देखील परवडत नाही. गवार, फ्लॉवर, फरसबी यांसारख्या भाज्या 160 रुपये किलो, भेंडी 100 रुपये किलो झाली असून कोथिंबीरची एक जुडी 80 ते 100 इतक्‍या भावाने विकली जात आहे. तसेच कोबी 160 रुपये किलो झाली आहे. लिंबाचा भाव देखील वधारला आहे. 3 लिंबू 20 रुपयांना विकले जात आहेत. शेवग्याच्या शेंगा 30 रुपयांना 3 असून, सिमला मिरची 80 रुपये किलो दराने विक ली जात आहे. आठ दिवसांपूर्वी हिरवा वाटाणा 200 रुपयांनी विकला जात होता त्याचा दर आता दुप्पट झाला आहे. 

भाजपच्या आक्रमतेला यशवंत जाधवांची पुन्हा टक्कर; स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सेनेकडून उमेदवारी

त्यामानाने काकडी 80 तर टोमॅटो 60 रुपये असल्याने त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. कांदा, बटाटा देखील पन्नास रुपये किलोने विकला जात आहे. कोरोना महामारीत लॉकडाऊन जरी हळूहळू शिथिल केला जात असला तरी मात्र बाजारात अनेक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने त्यात सर्वसामान्य नागरिक होरपळ होत आहे. 

 

कोरोनाकाळात माझी नोकरी गेली. कुटुंबाची जबाबदारी आहे. पूर्वी भाज्या स्वस्त होत्या मात्र आता बाजारात जाताच कालचा भाव आज अजून वाढलेला दिसतो. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या भाज्या घेणे देखील परवडत नाही. 
वनिता जाधव -
गृहिणी ,वसई. 

 

वाहतुकीचा परिणाम, इंधनाचे वाढलेले दर तसेच मागणीनुसार भाजीपाला पुरवठा होत नाही. कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे भाज्यांचे दर देखील वाढले आहेत असे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices hike Corona continues the common people in financial crisis