पावसाळा संपताच भाज्यांचे दर कडाडले; भेंडी, गवार, फरसबी १०० रुपये किलो

कृष्ण जोशी
Monday, 14 September 2020

पावसाळा संपण्याच्या बेतात असताना किरकोळ बाजारात पुन्हा  भाज्यांची भाववाढ झाली आहे

मुंबई : पावसाळा संपण्याच्या बेतात असताना किरकोळ बाजारात पुन्हा  भाज्यांची भाववाढ झाली आहे.दुसरीकडे त्यांचा दर्जाही घसरल्याने गृहिणींसमोर दुहेरी अडचण निर्माण झाली आहे. 

एका तोळ्याच्या सोनसाखळीसाठी मित्राची हत्या; गुन्हेगाराला 24 तासांत अटक - 

परळ-लालबाग भागात भाज्या काहीशा स्वस्त असल्या तरी पार्ला-बोरीवली येथे त्या `भाव` खातात. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फळभाज्या पुन्हा किलोमागे शंभरीच्या आसपास  आहेत. सिमला मिरची, भेंडी, गवार, फरसबी, पडवळ आदी भाज्या किलोमागे शंभर रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. मागील महिन्यात 40 रुपये पाव किलो असलेल्या फरसबीचा भाव आता 25-30 रुपयांपर्यंत उतरला आहे. गेले काही दिवस गायब असलेली तोंडली आता पुन्हा दिसू लागली आहे. पण त्यांनीही शंभरी पार केली आहे. मात्र ही तोंडली अत्यंत जाड व मोठी असल्याने परतून केलेल्या भाजीला नेहमीचा खमंगपणा येत नाही, असे गृहीणी सांगतात. 

सुशांतसिंग मृत्यूप्रकरण! बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी अलिशान कारमधून ड्रग्जची तस्करी - 

ग्रेव्हीसाठी लागणारा टॉमेटो दोन-तीन आठवड्यांपूर्वी दर्जानुसार 30 ते 40 रुपये किलो होता. मात्र आता त्याचा भाव 80 रुपयांच्या आसपास आहे. हे टोमॅटो देखील पिवळसर आहेत. एक किलो लालभडक, ताजे टोमॅटो हवे असतील तर शंभरची नोट देण्याची तयारी हवी.  कांदा देखील आता बटाट्याच्या बरोबरीने 40 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

पालक, कोथिंबीरीची जुडी रोडावली
पालक-शेपू-लाल माठ यांच्या जुड्या २० रुपयांपर्यंत आहेत, पण पालकाच्या जुडीची जाडी कमी झाली आहे. कोथिंबीरीच्या जुडीचा आकार सर्वात जास्त रोडावला आहे. एरवी 10 रुपयांना छोटी व 20 रुपयांना मोठी अशी कोथिंबिरीची जुडी मिळते. पण आता 10 रुपयांची छोटी जुडी पाहून विश्वासच बसत नाही. मोठ्या जुडीसाठी 50रुपये मोजावे लागतात. मेथीची जुडीही 20 रुपयांना आहे, मात्र पाने लहान व जुनी असल्याने ती पिवळी दिसत असल्याने ग्राहक नाक मुरडतात.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices skyrocketed after the monsoon