मुंबईत भाज्या महागल्या : फ्लॉवर 60 ते 80 रु. किलो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मुंबईत भाजीचे भाव दुप्पट झाले आहेत. परिणामी गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे

मुंबई : अवकाळी पावसामुळे लागवडीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे भाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. गुरुवारी (ता. 31) कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीसाठी 100 रुपये, तर मेथीसाठी 60 रुपये मोजावे लागत होते. ढोबळी मिरची 60 रुपये आणि फ्लॉवर 60 ते 80 रुपयांना एक किलो असा विकला जात आहे. राज्यातील लागवडीला पावसाने दणका दिल्यामुळे विक्रेत्यांना हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या भाजीपाल्याचा आधार घ्यावा लागत आहे.
 
अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेती पाण्याखाली गेली. कांदा, गाजर, बटाटा, बीट, सुरण आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. सुरण व बीट 30 वरून 60 रुपये किलोवर गेले आहेत. कोबी, फ्लॉवर सडल्यामुळे दुपटीने महाग झाले आहेत. नवा कांदा 40 रुपये आणि जुना 50 ते 60 रुपये किलो दराने विकला जात आहे. कांद्याची दैनंदिन आवक 200 वरून 35 गाड्यांपर्यंत कमी झाल्याचे सांगण्यात आले.

राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे मध्य प्रदेशातील इंदूर आणि हिमाचल प्रदेशातून भाजीपाला आणावा लागत आहे. लांबचा प्रवास असल्यामुळे भाजीपाल्याच्या दर्जात फरक पडतो आणि खर्चातही वाढ होते, असे भायखळा भाजी मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले. पाच महिन्यांपासून हिमाचल प्रदेशातून फरसबी मागवली जाते. राज्यातील कोथिंबीर लागवडीचे नुकसान झाल्यामुळे इंदूरहून आवक होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

भाज्यांचे दर (किलो/रुपये) 
           भाजी      पूर्वी            सध्या 

 • कांदा      40              60 
 • फ्लॉवर   40 ते 60      60 ते 80 
 • कोबी      20 ते 30      40 ते 45 
 • भेंडी       40 ते 50      60 ते 80 
 • टोमॅटो    20 ते 22      40 
 • बीट        20 ते 30      60 
 • सुरण      30 ते           40 60 
 • फरसबी   100 ते 150  200 ते 240 
 • गाजर      30 ते 40     60 ते 80 
 • कोथिंबीर  40             100 (मोठी जुडी) 
 • मेथी        25 ते 30     60 (मोठी जुडी) 

मुंबईत दररोज 800 ते 900 ट्रक भाजीपाला येतो; आता फक्त 400 ट्रक भाजीपाला येत आहे. त्यातही पावसामुळे बराचसा माल सडलेला असतो. भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. 
- किरण झोडगे, अध्यक्ष, भायखळा भाजी मंडई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables expensive in Mumbai ... Flower 60 to 80 rs kg