मुंबईत खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे आरोग्य धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मुंबई, उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, वाहन नादुरुस्तीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

मुंबई -  मुंबई, उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, वाहन नादुरुस्तीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. खड्ड्यांच्या त्रासामुळे शहरातील ४८ हजार टॅक्‍सी आणि एक लाख ५० हजार रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. टॅक्‍सी आणि रिक्षाचालकांना या खड्ड्यांचा फटका सर्वात जास्त बसतो आहे. खड्ड्यांमधून वाट काढताना प्रवासी वाहनांच्या बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे; तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्‍सी आणि रिक्षाचालकांमध्ये पाठीच्या मणक्‍याच्या, मानेच्या समस्या सर्वात जास्त आढळून येत असल्याचे डॉ. श्‍याम कांबळे यांनी सांगितले. राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडून रस्तेदुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते; मात्र तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर रस्त्यांची परिस्थिती जैसे-थे दिसून येत आहे. 

वाहन दुरुस्‍ती करून बेजार
सध्‍या वाहनांच्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये बेअरिंग, शॉकप, वायरिंग खराब होणे, कार्बोरेटरमध्ये पाणी जाणे, पेट्रोल टाकी खराब होणे, टायर पंक्‍चरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेजवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत आहेत. दिवसात जेवढे पैसे मिळत नाहीत, त्या तुलनेत अधिक पैसे वाहन दुरुस्तीसाठी द्यावे लागत आहेत. एकदा वाहन नादुरुस्त झाल्यास सुमारे २५ हजार रुपयांचा खर्च येतो.
- राजू मेश्राम, टॅक्‍सीचालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle drivers Health problem due to potholes