Vidhan Sabha 2019 : 'या' मतदारसंघात भाजपविरोधात शिवसेनेची अपक्ष उमेदवाराला साथ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

- वर्सोवा मतदार संघात भाजपची दमछाक 
- शिवसंग्रामच्या मेटेंची अडचण

मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदार संघात भाजपची मोठी अडचण झाली आहे. भाजपच्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराने तगडे आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघात भाजपच्या अडचणीत भर पडली आहे. शिवसेनेकडून अपक्ष उमेदवाराला होत असलेल्या छुप्या मदतीमुळेच हे होत आहे. येथील अपक्षांच्या लढतीने भाजपची मोठी दमछाक झाली असून शिवसंग्रामच्या विनायक मेटेंची मोठी अडचण झाली आहे. 

या मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर या भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. कॉंग्रेसचे बलदेश खासा आणि मनसेचे संदेश देसाई यांच्यात लढत होणार होती. या लढतीला रंगत आली आहे ती अपक्ष उमेदवार राजूल पटेल यांच्यामुळे. पटेल या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. या निवडणुकीत हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. मात्र हा मतदार संघ भाजपला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मतदार संघातील शिवसैनिक आणि राजूल पटेल यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर या मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरून भाजपला पटेल यांनी आव्हान निर्माण केले आहे. 

निवडणूकीच्या प्रचाराला आता रंग आला आहे. पटेल यांचा छुपा प्रचार शिवसेनेने सुरू केल्याचे दिसून येत आहे. हे भाजपच्या लक्षात आल्याने या मतदार संघात भाजपची दमछाक झाल्याचे दिसून येत आहे. या मतदार संघात लव्हेकर या विद्यमान आमदार आहेत. त्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या आहेत. या निवडणुकीत त्या भाजपच्या कमळ चिन्हावर लढत आहेत. पटेल याना शिवसेनेनाचा छुपा पाठिंबा अपक्ष पटेल यांना मिळू लागल्याने लव्हेकर नाराज झाल्याचे समजते. त्यामुळे येथे भाजपची मोठी दमछाक होत असली तरी मेटे यांची मोठी अडचण झाली आहे. युतीच्या पक्षश्रेष्ठींनी या मतदार संघातील बंडखोरीची फारशी दखल घेतली नसल्याचेही दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Versova Vidhan Sabha Constituency BJP on Back foot due to shivsena