शिक्षक, पदवीधरसाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २५) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांत ही निवडणूक होत आहे. विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जोर लावला आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

मुंबई - सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २५) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांत ही निवडणूक होत आहे. विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जोर लावला आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

विधान परिषदेच्या चार जागांपैकी मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी आहे. मुंबईत शिवसेनेने सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याऐवजी विलास पोतनीस यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने अमितकुमार मेहतांना उमेदवारी दिली आहे. पोतनीस यांच्यासाठी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठका घेतल्या होत्या. मेहतांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी नगरसेवक तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शिवसेना आणि भाजप उमेदवारांच्या व्यतिरिक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचा पाठिंबा असलेले शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र कोरडे रिंगणात उतरले आहेत. याशिवाय मराठी भाषा केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनीही जोर लावला आहे.  

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. भाजपने ‘राष्ट्रवादी’तून आलेल्या निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे; तर डावखरेंना रोखण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्लांना उमेदवारी दिली आहे. मुल्लांसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. शिवसेनेने येथून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मोरे यांना निवडून आणण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. 

मुंबई शिक्षक हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता; मात्र १२ वर्षांपासून कपिल पाटील यांनी या मतदारसंघात जम बसवला आहे. हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने या मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर असेल. शिवसेनेने येथून शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेनेचे किशोर दराडे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, ‘टीडीएफ’चे भाऊसाहेब नारायण कचरे आणि काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा पाठिंबा असलेले संदीप बेडसे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

शाळांना आज सुट्टी
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

लढतीचे चित्र 
मतदारसंघ    मतदार संख्या 
मुंबई पदवीधर    ७० हजार ६३६ 
कोकण पदवीधर    १ लाख ४२६४ 
मुंबई शिक्षक    १० हजार १४१ 
नाशिक शिक्षक    ५३ हजार ८९२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Parishad graduate and teacher constituency elections