Vidhan Sabha 2019 : महादेव जानकर म्हणतात, 'भाजपनं मला फसवलं'

टीम ई-सकाळ
Monday, 7 October 2019

माझ्यावर अन्याय झाला आहे, आता संयमातून मार्ग काढला पाहिजे, असे सांगत आपण, महायुतीत कायम असल्याचे रासप नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

मुंबई : महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर नाराज असल्याची माहिती मिळत होती. आज, मुंबईत पत्रकार परिषद घेत जानकर यांनी अस्वस्थता व्यक्त केली. माझ्यावर अन्याय झाला आहे, आता संयमातून मार्ग काढला पाहिजे, असे सांगत त्यांनी आपण, महायुतीत कायम असल्याचे स्पष्ट केले. महादेव जानकर यांनी आज, मुंबईत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी जानकर यांच्य समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेली 27 वर्षे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि आज ते अस्वस्थ आहेत, असेही जानकर यावेळी म्हणाले.

मला फसवले
भारतीय जनता पक्षाने मला फसवले आहे, असा आरोप महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, 'मी  स्वाभिमानी, माझ्यावर अन्याय झाला. मी विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होतो. दिल्लीतून माझ्या पक्षासाठी जागाही देण्यात आल्या पण, राज्याच्या कार्यकारिणीत काय झाले कळाले नाही. मी यावर मुख्यमंत्र्यांना विचारलं, तर त्यांनी याची माहिती नसल्याचं सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनीही पाहतो, असे सांगितले. आज, परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या जागेवर रासपचा उमेदवार रिंगणात आहे. महायुतीत ती जागा शिवसेनेकडे आहे. तेथे मैत्रीपूर्ण लढत करून मला सहकार्य करावे, अशी माझी शिवसेना-भाजपला विनंती आहे.'

करमाळ्यात शिवसेनेच्या रश्मी बागल यांना धक्का

ते नेते माझे नाहीत
रासपच्या नेत्यांनी भाजपच्या एबीफॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या मुद्द्यावर जानकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'ज्यांनी भाजपचा एबी फॉर्म घेऊन, अर्ज भरेल त्यांना मी बेदखल करतो. कारण ते आता माझे राहिले नाहीत. दौंड, जिंतूरचे उमेदवार भाजपचे झाले आहेत. माझा आग्रह आता फक्त गंगाखेडच्या जागेसाठी आहे. मी भाजप-सेना युतीचा 287 जागांसाठी प्रचार करणार आहे. त्यांनी मला एका जागेसाठी सहकार्य करावं.'

नाशिकमध्ये काँग्रेस-मनसेचं साटं लोटं

संयम महत्त्वाचा
जानकर म्हणाले, 'आमच्यावर अन्याय झाला आहे. पण, या परिस्थितीत संयमातून मार्ग काढला पाहिजे. लोकसभेच्या वेळीही लढलो नाही. आता बाहेर पडलो तर, समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. यांना काही मिळालं नाही म्हणून, बाहेर पडत आहेत, असा आमच्याविषयी गैरसमज होईल. त्यामुळे अन्याय झाला असला तरी, आम्ही युतीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 rsp leader mahadev jankar bjp injustice mahayuti