‘दिशा’प्रकरणी एसआयटी; जयंत पाटलांवर निलंबनास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

disha salian

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राजकीय कुरघोड्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Winter Session : ‘दिशा’प्रकरणी एसआयटी; जयंत पाटलांवर निलंबनास्त्र

मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राजकीय कुरघोड्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी शिंदे गटाने दिशा सालियन संशयास्पद मृत्यूप्रकरण थेट संसदेत मांडल्यानंतर आज राज्य विधिमंडळामध्ये राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकत या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली.

ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न यातून दिसून येतो. दुसरीकडे विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने केलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची घोषणा केली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हे निर्देश दिले.

सत्ताधाऱ्यांनाच शह देण्यासाठी विरोधकांनी फोन टॅपिंगप्रकरणाचा मुद्दा लावून धरत वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. यावरून बोलण्याची संधी न दिल्यामुळे विरोधकांनी विधानसभाअध्यक्षांना धारेवर धरले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी याच मुद्यावरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर बोचरी टीका केली खरी पण सत्ताधाऱ्यांनी त्याला आक्षेप घेत पाटील यांच्यावर निलंबनास्त्र सोडले. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये अधिवेशन भरविण्यामागच्या उद्दिष्टांना तिलांजली मिळत असल्याचे दिसते. विदर्भातील प्रश्न, बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांना बसलेला फटका, बेरोजगारीची उग्र बनत चाललेली समस्या, अस्वस्थ उद्योग जगत या साऱ्या मुद्द्यांपासून दूर जाऊन वैयक्तिक राजकारणातील हेवेदाव्यांमध्ये अधिवेशनातील बहुमूल्य वेळ खर्ची पडत असल्याचे महाराष्ट्रातील जनता पाहते आहे. गुरुवारीही त्याचेच प्रत्यंतर आले. शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना ज्या राजकीय धक्कातंत्रातून झाली, त्याचेच पडसाद अजूनही विधिमंडळात उमटत आहेत. सत्ताधारी पक्षातील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप अजूनही ''कशी जिरवली'' पवित्र्यात आणि महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेमक्या मुद्द्यांच्या शोधात अधिवेशनातील एकेक दिवस पुढे ढकलत आहेत.

दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी विविध प्रश्न उपस्थित करत शिंदे आणि भाजप गटाने चौकशीची मागणी केली. यामुळे विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला परिणामी सभागृहाचे कामकाज पाचवेळा तहकूब करावे लागले. अखेर या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर गोंधळ शांत झाला.विधानसभेत शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. "एका मुलीचा अशा प्रकारे मृत्यू होणे शोभनीय नाही. याबाबतची सर्व माहिती बाहेर आली पाहिजे." अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या गोंधळात सभागृह दहा मिनिटे तहकूब करावे लागले. त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू होताच भाजप आमदार नीतेश राणे यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात कोणाला वाचविले जात आहे.

तिच्या फोटोत कोण अतिमहत्त्वाची व्यक्ती होती?याची माहिती सभागृहाला मिळाली पाहिजे.अशी मागणी केली. चौकशीच्या मागणीसाठी सभागृहात गोंधळ सुरूच असल्याने त्यांनतर पुन्हा २० मिनिटांसाठी सभागृह तहकूब करावे लागले. सभागृहातील गोंधळ पुन्हा सभागृह सुरू झाले तरी गोंधळ थांबण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे पुन्हा सलग दोन वेळा १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यानच्या काळात भाजप सदस्य माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी आणि देवयानी फरांदे, अमित साटम आदी सदस्यांनी दिशा सालियान हिला न्याय देण्याची मागणी केली.अखेर साडेतीन वाजता सभागृह सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर गोंधळ शांत झाला. या सगळ्या गोंधळात विरोधी पक्ष मात्र कोणतीही भूमिका न घेता सभागृहात शांत बसून होता.

विरोधकांकडून फोन टॅपिंग प्रकरण पुढे

विरोधकांनी फोन टॅपिंग प्रकरणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचीही चौकशी करण्याची मागणी लावून धरली. मात्र त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलण्याची संधी देत नाहीत, याबद्दल संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या तोंडातून अपशब्द निघाले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक होत पाटील यांना निलंबित करा, अशी कठोर भूमिका घेतली. सत्ताधारी आमदारांनी यावरून जोरदार गोंधळ घातला. जयंत पाटील यांना या अधिवेशन कालावधीत निलंबित करण्याचा प्रस्ताव विधिमंडळ कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तो आवाजी मताने मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांनी महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. तसेच, घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. त्यांना व त्यांच्या खोके सरकारला एका ३२ वर्षांच्या तरुणाने हलवून ठेवले आहे त्यामुळेच लक्ष्य करण्यात येत आहे.

- आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे नेते

खासदार राहुल शेवाळे कधी संसदेत बोलत नाहीत. महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. मुंबईत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून खोटे आरोप करण्यात येत आहेत.

- रोहित पवार, राष्ट्रवादीचे आमदार

दिशा सालियानप्रकरणी राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना ते दडपण्याचे आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. दिशा सालियानच्या शवविच्छेदन अहवालात छेडछाड झाली आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे हे आताच्या राज्य सरकारला पटल्यामुळे त्यांनी चौकशी सुरू केली आहे. सुशांतसिंहची हत्या होताना आणि दिशा सालियानवर अत्याचार होताना काही लोकांनी आदित्य ठाकरे यांना घटनास्थळी पाहिले होते ते आता समोर येईल.

- नारायण राणे, केंद्रीयमंत्री