विजय मल्ल्याला फ्रान्स प्रशासनाचा दणका; 14 कोटींची मालमत्ता जप्त

अनिश पाटील
Friday, 4 December 2020

सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) तक्रारीनंतर फ्रान्समधील स्थानिक प्रशासनाने विजय मल्ल्याच्या मालकीची 32 अवेन्यू फोच येथील मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्ता 1.6 मिलीयन युरो (सुमारे 14 कोटी रुपये) किमतीची आहे

मुंबई ः सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) तक्रारीनंतर फ्रान्समधील स्थानिक प्रशासनाने विजय मल्ल्याच्या मालकीची 32 अवेन्यू फोच येथील मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्ता 1.6 मिलीयन युरो (सुमारे 14 कोटी रुपये) किमतीची आहे. मे. किंगफिशर एअरलाईन्स लिच्या खात्यावरून कोट्यवधींची मालमत्ता परदेशी गेल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. 

विविध कारणांमुळे बंद असलेली राज्यातील विविध मद्याची दुकाने सुरू होणार

विजय मल्ल्या 2 मार्च 2016 ला लंडनला गेला होता. किंगफिशरने बॅंकांकडून घेतलेल्या नऊ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड न करता मल्ल्या लंडनमध्ये राहत आहे. अनेकदा न्यायालयाने मल्ल्याला अटक वॉरंट बजावले. याप्रकरणी सीबीआयनंतर ईडीनेही गेल्या वर्षी गुन्हा दाखल केला होता. भारत आणि ब्रिटनमध्ये 1992 मध्ये गुन्हेगार हस्तांतरण करार झाला आहे. या करारानुसार आर्थिक गुन्ह्यातील आरोपी म्हणून विजय मल्ल्याला ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने ब्रिटन सरकारकडे केली होती. त्यानुसार मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी 11 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत हे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ईडीनेही मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर 5 जानेवारी 2019 मध्ये मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर केले होते. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सध्या सीबीआय व ईडी दोन्ही यंत्रणा प्रयत्न करत आहेत. 

Vijay Mallya action by French government Assets 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Mallya action by French government Assets